नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा; पोलीस करताहेत कारवाईकडे दुर्लक्ष
पुणे : शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाची विक्री सुरू असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. रविवार पेठ आणि मध्यवस्तीतील बाजारपेठेसह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही विक्री सुरू आहे. यासोबतच झोपडपट्टयांमध्ये देखील नायलॉन मांजा छुप्या पद्धतीने विकला जात आहे. हा मांजा नागरिक तसेच प्राणांसाठी जीवघेणा ठरत आहे. नायलाॅय मांजामुळे दुचाकीस्वार तरुण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना गुलटेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलावर घडली.
या घटनेत या तरुणाचे बोट कापले गेले असून त्याच्या गळ्याला देखील इजा झाली आहे. हृषिकेश वाघमोडे (रा. भारती विद्यापीठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या गळ्याला आणि हाताला टाके पडले आहेत. वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृषिकेश हे रविवारी (दि. ८) दुपारी त्यांच्या दुचाकीवरुन जात होते. गुलटेकडी येथील डायस प्लॉट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूलावरुन जात असताना त्यांच्या गळ्याला काहीतरी कापत जात असल्याचे जाणवले. त्यांना वेदना झाल्याने त्यांनी पटकन गळ्याला हात लावला. त्यावेळी त्यांच्या गळ्याला मांजा लागला. गळ्यात रुतत चालेला हा मांजा काढण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांच्या हाताची बोटेही कापली गेली. त्यांनी तातडीने दुचाकी सोडून दिली आणि खाली उतरण्याचा प्रयत्न केला. अन्य वाहनचालकांनी गाड्या थांबवून त्यांना तत्काळ मदत केली. त्यांना जवळच्या दवाखान्यात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले.
शहरात सगळीकडे सध्या पतंग उडविण्याचे सत्र सुरू झाले आहे. संक्रांत जवळ आली की पंतग उडविण्यास प्रारंभ केला जातो. मागील काही वर्षात पारंपरिक मांजाचा वापर मागे पडत चालला असून इतरांचे पतंग कापण्यासाठी नायलॉन मांजा वापरला जाऊ लागला आहे. पतंगापेक्षाही लोकांचे गळेच अधिक कापले जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अधिक गांभीर्याने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. या मांजाच्या विक्रीवर पूर्ण बंदी आणावी; तसेच चिनी बनावटीचा मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक सातत्याने करत आहेत. मात्र, या कारवाईकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) बंदी घातलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असून या मांजाच्या विक्रीसाठी अल्पवयीन आणि नवख्या तरुणांचा वापर व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. नफेखोरीसाठी अनेक व्यापारी धारदार नायलॉन मांजाची विक्री करीत आहेत. दरवर्षी या मांजामुळे अनेकांचे गळे कापले जातात. तर, शेकडो पक्षांना आपले प्राण गमवावे लागतात किंवा त्यांचे पंख कापले जातात. पुण्यात अलीकडच्या काळात पतंग महोत्सव आयोजित केले जात आहेत. गल्ली बोळातदेखील पतंग उडविण्याचा उत्साह असतो. सोसायटयांच्या छतावरून पतंग उडवले जातात. पतंग उडविण्यासाठी दोऱ्याला रंग लावून त्याला काचेचा भुगा लावून मांजा तयार केला जातो. या मांजामुळेदेखील एकदा दुर्घटना घडत होत्या. मागील काही वर्षात भारतात नायलॉन मांजाची विक्री सुरू झाली.
काही उदाहरणे…
१. मागील वर्षी दुचाकीवरून जात असलेले मुख्यालयाचे दोन पोलीस नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाले होते. ही घटना पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर घडली होती. पोलीस कर्मचारी महेश पवार आणि सुनील गवळी हे दोघे जखमी झाले होते. पवार आणि गवळी दोघे पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावरून दुचाकीवरून जात होते. त्या वेळी मांजा मानेला अडकल्याने पवार यांचा गळा कापला गेला होता. तर, गवळी यांचा हात मांजामुळे कापला गेला होता.
२. दोन वर्षांपूर्वी मांजाने गळा कापल्यामुळे एका वृत्तपत्रातील जाहिरात आणि मार्केटिंग विभागातील कर्मचारी असलेल्या सुवर्णा मुजुमदार यांचा २०१८ मध्ये मृत्यू झाला होता. सुवर्णा या पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या शिवाजी पुलावरुन दुचाकीवरुन घरी जात होत्या. यावेळी त्यांच्या गळ्याभोवती चिनी मांजा गुंडाळला गेला होता. त्यामध्ये त्यांचा गळा कापला गेला होता. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता.
३. पिंपरीतील कृपाली निकम या डॉक्टर तरुणीचाही मांजाने २०१८ मध्ये बळी घेतला होता. डॉ. कृपाली या पुण्याहून भोसरीला दुचाकीवरुन परतत होत्या. त्यावेळी रात्री नाशिक फाट्याच्या उड्डाणपुलावर मांजाने त्यांचा गळा चिरला गेला. त्यानंतर त्या २० मिनिटे रक्ताच्या थारोळ्यात पडून होत्या. मात्र एकही गाडी त्यांच्या मदतीला थांबली नव्हती. मानेला जखम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. तसेच, पिंपरीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या हमजा खानचा डोळा या मांजामुळे कापला गेला होता. त्याच्यावर बत्तीस टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तर, रंगनाथ भुजबळ या ज्येष्ठ नागरिकाचा गळा कापता-कापता बचावला होता.
४. मागील वर्षे मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यातील ड्युटी संपवून घरी जात असताना पोलीस शिपाई समीर सुरेश जाधव (वय ३७, रा. वरळी बीडीडी चाळ, मुंबई) यांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला. त्यामध्ये त्यांचा गळा चिरला गेला. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. सांताक्रूजमधील वाकोला ब्रिजवर ही घटना घडली होती.