लवकरच देशात धावणार ‘वंदे भारत’ स्लिपर कोच, मेट्रो

Photo of author

By Sandhya

देशात धावणार ‘वंदे भारत’ स्लिपर कोच, मेट्रो

देशातील धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळे आणि आर्थिक राजधान्यांना जोडणारा ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने मार्गक्रमण करू लागल्यानंतर आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होतो आहे.

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसबरोबर भारतीय रेल्वेच्या ताफ्यात ‘वंदे भारत स्लिपर कोच’ आणि ‘वंदे भारत मेट्रो’ या दोन प्रकल्पांच्या कामाने गती घेतली आहे. यातील ‘वंदे भारत’ ही दीर्घ पल्ल्याची स्लिपर कोच गाडी मार्च 2024 मध्ये म्हणजेच ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत रूळावर दाखल होईल, असे नियोजन केले आहे.

‘वंदे भारत’ ही अस्सल भारतीय बनावटीची रेल्वे आहे. या गाडीच्या डब्यांचे काम इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीटी) येथे केले जाते. या संस्थेचे सरव्यवस्थापक बी. जी. मल्ल्या यांनी याला दुजोरा दिला आहे.

याखेरीज ‘वंदे भारत मेट्रो’ ही 12 डब्यांची गाडी बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर नव्या वर्षाच्या प्रारंभालाच जानेवारी 2024 मध्ये छोट्या अंतरासाठी बनविलेली गाडी जनसेवेसाठी दाखल होईल.

‘वंदे भारत’ ही भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड रेल्वे आहे. त्याच्या उभारणीचे काम 2017 च्या मध्याला सुरू झाले होते.

अवघ्या 18 महिन्यांत चेन्नईस्थित आयसीटी येथील प्रकल्पामध्ये या गाडीच्या बांधणीचे काम पूर्ण झाले आणि 15 फेब्रुवारी 1019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली ते हरिद्वार या पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखविला होता.

‘वंदे भारत’ प्रकल्पामध्ये बिगर वातानुकूलित 22 डब्यांच्या गाड्याही बनविण्याचा एक प्रकल्पही कार्यरत आहे. त्याचे ‘पुश-पूल ट्रेन’ असे नामकरण केले आहे.

या गाड्या 31 ऑक्टोबरपर्यंत मार्गावर धावू शकतील, असे नियोजन करण्यात आले आहे. अत्याधुनिक सुविधांचा लाभ होणार देशात सध्या 50 ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावत आहेत.

या गाड्यांपैकी कोटा-सवाई माधोपूर या विभागात या गाडीने प्रतितास 180 किलोमीटर वेग साध्य करून दाखविला होता. आता दीर्घ पल्ल्याच्या स्लिपर कोच ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहेच. शिवाय, अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेण्याची संधीही त्यांना मिळणार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page