राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा- ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवालीत उपोषण सुरु केले आहे तर त्यांच्या मागणीला विरोध करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे वडीगोद्री येथे उपोषणास बसले आहेत.
आज उपोषणाच्या सहाव्या दिवशी संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर संभाजीराजेंनी मनोज जरांगेंची प्रकृती बघवत नाही असं म्हणत सरकारवर निशाणा साधला. अशातच आता जरांगे पाटील- छत्रपती संभाजी राजेंच्या भेटीवरुन लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केला आहे.
लक्ष्मण हाकेंचा संताप ‘मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजीराजे यांना गरिबांचा कळवळा नाही. छत्रपती संभाजीराजेंना राजे म्हणणार नाही, तुम्ही छत्रपती शिवरायांचे, शाहू महाराजांचे वारस नाही.
मनोज जरांगेंना मराठा समाजाचा मक्ता दिला आहे का? असे म्हणत मनोज जरांगे पाटील आणि संभाजीराजेंनी औकातीत बोलावं, गादीची माफी मागून सांगतो, रयत तुम्हाला राजे मानत नाही, मी तुम्हाला राजे म्हणणार नाही, मिस्टर संभाजी भोसले म्हणणार,’असे लक्ष्मण हाके म्हणाले.
छत्रपती संभाजीराजेंवर टीका ‘तुम्ही छत्रपती शिवरायांचे वारस असता तर पहिल्यांदा तुम्ही आमच्या आंदोलनाला भेट दिली असती. राजा राणीच्या पोटातून नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतपेटीतून जन्माला येतो. यापुढे कोणीही ओबीसी जनता तुम्हाला राजे म्हणणार नाही. ओबीसी नेत्यांनाही विनंती आहे.
तुम्ही ओबीसींची भाषा बोलणार नसाल तर जनता विचार करतील जे नाराज असतील ते असतील. ओबीसी नेत्यांना विनंती आहे की जो पर्यंत दबावात राहाल तोपर्यंत जरांगे तुमचा पराभव करेल, त्यामुळे उघड पुढे या आणि विश्वास बना,’ असे आवाहन लक्ष्मण हाकेंनी केले.