मराठा तितुका मेळवावा नाही, मराठा तितकाच मिळवावा आणि ओबीसी संपावावा, असे या मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. तुम्हाला जीआर काढण्याचा कोणी अधिकार दिला, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री यांना केला. ओबीसी आंदोलन प्रश्नी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून या दिवशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जरांगे व सरकारवर चांगला निशाणा साधला.
बेरोजगारी आहे, रोजगार द्या ही मराठा समाजाच्या तरुणांची मागणी होऊ शकते. पण त्यांना ओबीसींचे कसे काय आरक्षण मिळू शकते. जरांगे शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांना का बोलत नाहीत. प्रत्येक उपोषणाला जरांगे त्यांची मागणी बदलत आहेत. यापुढे निवडणुका या ओबीसी विरुद्ध मराठा अशाच होणार आहेत. प्रस्थापितांचे राजकारण संपणार आहे, असा इशारा हाके यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांचे कायदेशीर सल्लागार कुठे आहेत. सरकार बैठक घेवून ढोपराला गुळ लावते आहे. बैठकीतून काय सिद्ध होणार आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. साध्या सोप्या भाषेत बोलतोय सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता. टेंडर, दोन नंबरचे बोगस धंद्यांचे संरक्षण करणारा हा मुख्यमंत्री आहे.
त्यामुळे या लोकांना सामाजिक न्यायाची व्याख्याच माहिती नाही. रिझर्व्हेशन म्हणजे प्रतिनिधित्व, मराठ्यांचे प्रतिनिधित्व नाही असे कशात म्हणायचे आहे मुख्यमंत्री तुम्हाला. एकनाथ राव कान उघडे ठेवून ऐका, रिझर्व्हेशन म्हणजे गरीबी हटाव नाही. मुख्यमंत्री जबाबदार आहेत, सहीचे अधिकार कोणाला त्यांनाच म्हणून त्यांना टार्गेट केले जात असल्याचे हाके यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेबांच्या शिवसेनेला वाढविण्यासाठी ओबीसी, एससी जाती खपल्या. ते उद्धव ठाकरे आता मराठ्यांना उमेदवारी देतात. शिवसेनेत ओबीसीला डावलले जातेय, शिवसेनेमध्ये तिकीट मिळवण्यासाठी 20, 20 कोटी रुपयांची मागणी केली जाते. गरीब शिवसैनिकांना डावलले जाते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिली नाही, अशी टीका हाके यांनी केली.
हाके आणि वाघमारे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत, असे रोहित पवार म्हणत आहेत. हो आम्ही आहोत त्यांचे समर्थक, ते काही दहशतवादी आहेत का? मग जरांगे हे कोणाचे समर्थक आहेत हे त्यांनी सांगावे. ओबीसींच्या हक्काच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागा लाटण्यासाठी जरांगेचा डाव आहे. सरकारने आता हैद्राबाद, सातारा बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
ते लागू करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे का, कोणी दिला असा सवाल हाके यांनी केला. ओबीसींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही हे आंदोलन सुरु केले आहे. ओबीसींच्या आरक्षणावर कोणी बोलत नाही. ओबीसींच्या प्रश्नाचे यांना काही देणं घेणं आहे की नाही.
यांना निवडणुकी शिवाय भाषाच कळत नाही, असा आरोप हाके यांनी केला. राज्यात तर प्रत्येक पक्ष लाभार्थी आहे. सत्तेत कोण, विरोधात कोण हेच कळत नाहीय, असे हाके म्हणाले.
आमदार, खासदार द्यायची वेळ आली की उद्धव ठाकरे हे मराठ्यांना संधी देतात. शिवसेना उद्धव ठाकरे गटात ओबीसींना संधी दिली जात नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली.
जरांगेंनी ८८ उमेदवार उभे करून निवडून आणावेत – वाघमारेजरांगे यांनी खोके घेऊन लोकसभेला पाठिंबा दिला आणि पैशावाले निवडून आले. जरांगेंनी ई डब्ल्यू एस वाल्यांचे वाटोळे केले. जरांगे यांनी 288 नाही तर 88 उमेदवार उभे करून निवडून आणून दाखवावेत, असे त्यांना आव्हान नवनाथ वाघमारे यांनी दिले.