जिजामाता विद्यालयात डॉ.राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नवनियुक्त पी.एस.आय निखिल राणे यांचे “मी कसा घडलो” या विषयावर व्याख्यान!

Photo of author

By Sandhya


जेजुरी : श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जेजुरी, तालुका पुरंदर या विद्यालयात भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी डॉ.राजेंद्र चंद्रकांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाचा माजी विद्यार्थी, नवनियुक्त पी.एस.आय निखिल राणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होत

यावेळी माजी विद्यार्थी पी.एस.आय निखिल राणे यांनी “मी कसा घडलो” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ते आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात म्हणाले की, मी पहिले ते दहावीपर्यंत जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जेजुरी याच विद्यालयात घडलो, याच विद्यालयात शिक्षकांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले, मला वैयक्तिक मार्गदर्शन केले, अभ्यासात मी कमी पडलो तर शिक्षक माझ्या घरी येऊन मला मार्गदर्शन करत होते, याच जिजामाता विद्यालयात माझी स्पर्धा परीक्षेची पायाभरणी शासकीय एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून झाली,त्यामुळे याच विद्यालयात मला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची सवय लागली व माझा गणित व बुद्धिमत्ता या दोन महत्त्वाच्या विषयांचा पाया पक्का झाला, त्याचा उपयोग मला एम.पी.एस.सी परीक्षेत झाला, ते पुढे म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्याने खूप मोठे स्वप्न पाहिले पाहिजे, त्या स्वप्नांचा कृतीतून पाठपुरावा केला पाहिजे, प्रत्येकाने अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे, अभ्यासा बरोबरच शारीरिक आरोग्य व व्यायामाला महत्त्व दिले पाहिजे.
पी.एस.आय होण्यासाठी मी खूप परिश्रम घेतले, लहानपणीच पी.एस.आय होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते, स्वतःला शिस्त लावून घेतली होती, तासन् तास अभ्यास करत होतो,मी माझ्या अभ्यासावर निष्ठा ठेवली होती, स्पर्धा परीक्षांची एकत्रित तयारी केली होती, त्यासाठी काही क्लुप्त्या असतात त्या वापरल्या होत्या, मी सर्व अभ्यास घरची कामे करून केला आहे , मी स्वतःचे अस्तित्व तयार करण्याचे लहानपणीच ठरवले होते, त्याप्रमाणे मी अभ्यास केला व पी.एस.आय झालो.
विद्यार्थ्यांनी लहानपणीच आपण कोण होणार आहे याची स्वप्ने मनाशी बाळगली पाहिजेत, त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे, आपले ध्येय आपण आत्ताच निश्चित केले पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव, विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले, आपल्या प्रास्ताविक पर मनोगतात ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थी संस्कारक्षम घडण्यासाठी आई- वडील, शिक्षक यांचे संस्कार महत्त्वाचे असतात,आई-वडील व शिक्षक यांनी लक्ष दिल्यास विद्यार्थी खूप उत्तम प्रकारे घडत असतात. संस्थेचे विशेष सल्लागार व भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी डॉ. राजेंद्र चंद्रकांत जगताप यांनी स्वच्छ व सुंदर शहर या स्पर्धेत मध्य प्रदेश राज्यांमध्ये महू कॅन्टोन्मेंट बोर्डाचा प्रथम क्रमांक मिळवला, तसेच सासवड शहराचा स्वच्छ व सुंदर शहर या स्पर्धेत पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजयजी जगताप यांनी संस्थेच्या अध्यक्षा आनंदी काकी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देशात प्रथम क्रमांक मिळवला, हे सर्व ते करू शकले ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.चंदुकाका जगताप यांनी केलेल्या संस्कारामुळे मुळेच.

स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी आपल्या मुलांच्यावर खूप उत्तम प्रकारे संस्कार केले, त्यामुळेच डॉ. राजेंद्र जगताप व पुरंदर हवेलीचे मा.आमदार संजयजी जगताप घडले, याचा संपूर्ण पुरंदर हवेलीतील जनतेला सार्थ अभिमान आहे. डॉ. राजेंद्र जगताप यांनी विविध कॅन्टोन्मेंट बोर्ड या ठिकाणी सेवा केली. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या सर्व ठिकाणी कामाचा ठसा उमटविला. पुणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांनी काम केले, त्यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या सर्व प्रॉपर्टीज सुस्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे पी. एम.पी.एलचे ते अध्यक्ष झाले, त्या ठिकाणी त्यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व खेडोपाडी पी. एम.पी.एलची दळणवळणाची सेवा उपलब्ध करून दिली.पी. एम.पी.एलच्या सर्व कामगारांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी ते आग्रही राहिले.

पुणे स्मार्ट सिटीचे आयुक्त म्हणून काम करताना पुणे शहर उत्तम घडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, पुणे शहराला मेट्रोसिटी बनवण्याचे काम त्यांनीच केले, तसेच त्यांनी पुणे शहरात दळणवळणाच्या साठी दर्जेदार पूल निर्मिती केली.
पुणे शहराची ओळख सायकलींचे शहर म्हणून होती त्यासाठी त्यांनी सायकल स्वरांना स्वतंत्र ट्रॅक,(सायकल मार्ग) उपलब्ध करून दिला. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले त्या सर्व ठिकाणी डॉ.राजेंद्र जगताप यांनी आपल्या कामाचा उत्तम ठसा उमटविला.
सूत्रसंचालन प्राध्यापक मधुसूदन जगताप यांनी तर आभार पर्यवेक्षक सतीश पिसाळ यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे, शाळा समन्वय प्रल्हाद गिरमे, माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप,सोनबा दुर्गाडे,सोमनाथ उबाळे,छाया पोटे,पांडुरंग आटोळे,अजय जगताप,मयूर शिंदे,कैलास सोनवणे,राघू हारुळे,सागर चव्हाण,महेश खाडे,सारिका कामथे यांनी केले.

Leave a Comment