शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद आणि समन्वयातून पुरंदरच्या तळातील घटकापर्यंत विविध योजनांचा लाभ देण्यास मदत होईल. त्यामुळे यापुढील काळात शासनाच्या खात्यांत एकमेकांत आणि लोकप्रतिनिधींमध्ये संवाद व समन्वय, मान सन्मान राहील याची काळजी घ्या, प्रत्येक नागरीकाचे काम करा असे आवाहन आमदार संजय चंदूकाका जगताप यांनी केले.
सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात बुधवारी ( दि २४ ) पुरंदरची आमसभा आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये जनतेतून प्रश्नाचा पाऊस पडला. मुख्यत्वे विद्युत मंडळ, आरोग्य, पुरंदर उपसा आणि स्थानिक पातळीवर महसूल विभागाच्या कर्मचा-यांच्या कामाबाबत नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
पुणे जिल्हा परिषद आणि पुरंदर पंचायत समितीच्या माध्यमातून आणि आमदार संजय जगताप यांच्या सूचनेप्रमाणे या आमसभेचे आयोजन केले. शासनाच्या अधिका-यांकडून कामकाजाचा आढावा घेण्यात आला व त्यानंतर नागरिकांना मत मांडण्याची संधी देण्यात आली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ वर्षा लांडगे,
तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ अमिता पवार, तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, पालिका मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण, चारूदत्त इंगोले, माजी जि प अध्यक्ष विजय कोलते, माजी जि प सदस्य सुदामराव इंगळे, बबुसाहेब माहुरकर, नंदूकाका जगताप, प्रदीप पोमण, माणिकराव झेंडे, सुनिता कोलते,
नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, दिलीप गिरमे, महादेव टिळेकर, माऊली यादव, चेतन महाजन यांसह सासवड व जेजुरी नगरपालिकांचे सर्व सदस्य, विविध गावांचे सरपंच, सदस्य, शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुक्यातील महिला बचत गटांना २ कोटी ५० लाखांचा धनादेश आमदार संजय जगताप यांच्या हस्ते देण्यात आला. बैठकीमध्ये प्रामुख्याने पुरंदर उपसा, जनाई उपसा, गुंजवणी योजना, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा, आरोग्य विभाग, विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराचा विषय गाजला.
चुकीच्या पद्धतीने होणारी विजेची आकारणी, कृषी पंपांच्या वीजबिलाबाबतचे प्रश्न मांडले. याबरोबरच अनेक गावांतील शेतकरी, ग्रामस्थांनी ग्रामसेवक, तलाठ्यांची गावातील अनुपस्थिती तसेच विविध नोंदी करण्यास होत असलेला विषय, पालखी महामार्गाची प्रलंबित कामे, भुमी अभिलेख, पोलीस प्रशासन, कृषी विभागाच्या योजना,
पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, पानंदरस्ते, शिवरस्ते आदी विविध वैभागातील नागरिकांनी विषयांवर प्रश्न केले. तसेच नागरीकांची होणारी गैरसोय पाहता १५ आॅगस्टचे ध्वजारोहण नवीन प्रशासकीय कार्यालयावर पालकमंत्री किंवा नागरीकांच्या हस्ते करण्याबाबतचा ठराव याप्रसंगी करण्यात आला.
पुरंदरसाठी महत्वाची पुरंदर उपसा आणि जनाई उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालविणे, फिल्टर बसविणे, गावोगावी पाणी वापर सोसायट्या करणे तसेच गुंजवणीबाबत आढाव बैठक झाली आहे.
उपमुख्यंमत्री अजित पवार, खा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थिती बैठक घेऊन योजना पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही आमदार संजय जगताप म्हणाले. जेजुरी ग्रामीण परिसराचा नगरपालिका तसेच ग्रामीण भागातही समावेश होत नसल्याने येथील नागरिकांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.
त्यामुळे या भागाचा पालिका हद्दीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर या भागाचा पालिका हद्दीत समावेश होईल असे आमदार संजय जगताप यांनी सांगितले. गटविकास अधिकारी डॉ अमिता पवार यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
कृषीपंपाच्या विजबिल माफीचा लाभ शेतकर्यांना द्या.
कृषीपंपाच्या ५ एच पी च्या पंपाचे ७.५ एच पी ने बील केले जाते व ७.५ एच पी पंपाचे १० किंवा १२.५ एच पी ने बील येते. याबाबत विद्युत वितरण कार्यालयाने वाढवलेले एप पी कमी करून विजबील माफीचा लाभ घ्यावा. एक गाव एक दिवस योजनेच्या कामाचा आढावा द्यावा तसेच शेतातील पोल हलवताना शेतकर्यांना तोषीस लागू नये याबाबत या बैठकीत ठराव करण्याचे आदेश आमदार संजय जगताप यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे निधी उपलब्ध करून नवीन विजजोड देण्यात यावीत अशा सुचना आ संजय जगताप यांनी विद्युत वितरणला दिल्या. विजबील साध्या भाषेत असावे, अनामत घेता तशा सेवा देणे, शेतातील पोल व डी पी चे भाडे शेतकऱ्यांना द्यावे असेही ठराव याप्रसंगी करण्यात आले. लोंबकळणाऱ्या तारा, वाळलेले पोल, रोहित्रांच्या दुरूस्ती तातडीने कराव्यात अशा सुचना आ संजय जगताप यांनी दिल्या.
दफनभूमीच्या जागेवर माॅल… कारवाई करा
सासवड येथील भटक्या विमुक्त जातीच्या लोकांसाठी दफनभूमीच्या आरक्षित जागेवर माॅलचे काम सुरू आहे. याबाबत मी पत्र देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र अधिका-यांच्या भ्रष्ट कारभारामुळे काम सुरू आहे. ते तातडीने थांबून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश याप्रसंगी आमदार संजय जगताप यांनी दिले. याबरोबरच आमदार संजय जगताप यांनी अधिकाऱ्यांना सज्जड इशाराही दिला.
पाण्याचे टँकर बंद करू नका….
पुर्व पुरंदरमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असताना आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नसतानाही पंचायत समितीने पाण्याचे टँकर बंद केले असल्याच्या तक्रारी आल्या. याबाबत बोलताना आमदार संजय जगताप यांनी, पाण्याचे टँकर तातडीने सुरू करावेत तसेच स्थळ पाहणी केल्याशिवाय तसेच ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय टँकर बंद करू नयेत अशा सुचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.
तर आरोग्य केंद्र बंद करा
याप्रसंगी अनेक गावांतील नागरीकांतून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अभावी नागरीकांची गैरसोय होत असल्याने असे दवाखाने बंद ठेवावेत अशी तक्रारी आल्या. याबाबत बोलताना आमदार संजय जगताप यांनी, ज्या ठिकाणी पुरेसे कर्मचारी उपलब्ध होतात तेच दवाखाने सुरू ठेवा. पुरेसे कर्मचारी उपलब्ध होत नसणा-या ठिकाणचे दवाखान्यांना कुलूप लावा असा ठराव करण्याचे सांगितले. तसेच अशा ठिकाणी आम्ही सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून दवाखाने चालवू असेही आमदार संजय जगताप म्हणाले.