मुंबई : महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर माध्यमांशी बोलताना केला.
आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम केले आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. लोकसभेला ईव्हीएमने ३१ जागा महाविकास आघाडीला दिल्या त्यावेळी ईव्हीएम मशीन खूप चांगली होती. मात्र विधानसभेत महायुतीच्या बाजुने जनतेने कौल दिला तर ईव्हीएमला दोष द्यायला मविआने सुरुवात केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. परंतु महाविकास आघाडीच्या आमदारांना शपथ घेण्याचा उद्याचा दिवस आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल. तरच त्यांना सोमवारी कामकाजात भाग घेता येणार आहे. याबाबतची माहिती सर्वांना आहे. परंतु पहिल्याच दिवशी आम्ही संख्येने कमी असलो तरी आम्ही काही वेगळ करतोय. त्यांचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रकार सुरू आहे असा खोचक टोलाही अजित पवार यांनी केला.
सुरुवातीला महाविकास आघाडीचे आमदार शपथविधीसाठी सभागृहात बसले होते मात्र काही वेळाने ते सर्व बाहेर निघून गेले. इतकी वर्षे मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा मी चांगला होतो. मी कुणासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केले नाही ते सांगा अशी विचारणा करत मी जर दोषी असतो किंवा भ्रष्टाचारी असतो तर त्यांनी मला उपमुख्यमंत्री केलेच नसते. मात्र सध्या ते राजकीय भूमिकेतून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु मी योग्यठिकाणी न्याय मागत होतो आणि तो मला मिळाला आहे असेही अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांला उत्तर देताना स्पष्ट केले.