राज्यातील मराठा व धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न दिल्लीच्या हातात आहे. तो आमदार म्हणून माझ्या किंवा राज्य शासनाच्या हातात नाही.
त्यामुळे मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा, दिल्लीत रासपची सत्ता आणा. मी तुमचा आरक्षणाचा प्रश्न दहा मिनिटांत सोडवतो, अशी टिपणी माजी मंत्री महादेव जानकर यांनी येथे केली.
बळीराजा शेतकरी संघटनेने ऊस व दूध दराबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रॅली काढण्यात आली. त्यासाठी जानकर येथे आले होते. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी त्यांनी अभिवादन केले. ते म्हणाले, ‘‘मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे.
संसदेत ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवला पाहिजे. २००९ मध्ये मी पहिल्यांदा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणाचा हक्कदार असल्याबाबतचे पुस्तक लिहिले आहे.
मात्र, त्यावेळी मला विरोध झाला. तमिळनाडूत ६३ टक्के आरक्षण आहे, मग महाराष्ट्रात असे का होत नाही. आता जनतेने हुशार झाले पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न हा मी आमदार म्हणून माझ्या किंवा राज्य शासनाच्या हातात नाही. तो दिल्लीच्या हातात आहे.
मला खासदार करून दिल्लीला पाठवा, दिल्लीत रासपचे सरकार आणा, पंजाबराव पाटील यांना रासपचे खासदार करा. मी तुमचा आरक्षणाचा प्रश्न दहा मिनिटांत सोडवून टाकतो, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. शेतकरी व कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी, अशी अपेक्षा जानकर यांनी येथे केली.