मराठी भाषा-संस्कृतीच्या जतनासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा — डॉ. गोऱ्हे
Maharashtra Times’ initiative celebrates Marathi language and culture; Deputy Speaker Dr. Neelam Gorhe’s inspiring guidance to the youth

मराठी दिनानिमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स’द्वारे आयोजित करण्यात आलेल्या “माय मराठी कलासंगम — उत्सव मराठीचा” या कार्यक्रमात तरुण पिढीचा उत्स्फूर्त सहभाग पाहून विशेष आनंद झाल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही दैनिक महाराष्ट्र टाइम्स तर्फे भाषा, कला, साहित्य आणि संस्कृतीचा संगम घडवून आणणारा “शोध युवा प्रतिभेचा” उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला मंत्री प्रतापराव सरनाईक, निवासी संपादक समीर कर्वे,मराठी बाणा फेम अशोक हांडे,कथा लेखिका शिल्पा कांबळे, अभिनेते पुष्कर श्रोत्री, उद्योजक विठ्ठल कामत, रघुवीर खेडकर, प्रा. आदित्य दवणे यांच्यासह परीक्षक व सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मुख्य संपादक पराग करंदीकर यांनी व सहकाऱ्यांनी केले.
तरुणांनी मराठीशी नाळ जोडणे गरजेचे- डॉ. गोऱ्हे
आपल्या भाषणात डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सरासरी वय पाहिले तर ते साधारणपणे पन्नाशीच्या पुढे दिसते; परंतु तरुण पिढीने जर भाषेशी नाळ जोडली नाही तर भाषा हळूहळू दुर्मिळ होण्याचा धोका असतो. मराठीला अभिजात दर्जा मिळणे ही अभिमानाची बाब असून तमाशापासून लोकसाहित्यापर्यंत, आरत्या ते ग्रंथपरंपरा आणि खाद्यसंस्कृतीपासून गीतपरंपरेपर्यंत सर्व घटकांचा त्यात समावेश होतो, असे त्यांनी नमूद केले. भाषा, भूषा, भोजन आणि भवन या चार घटकांतून संस्कृती पुढे जाते, हा विचार त्यांनी अधोरेखित केला.
महाविद्यालयीन काळात लेखन, निवडणुका आणि उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याच्या आठवणी सांगत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पुरस्कार मिळालेल्यांचे अभिनंदन करताना त्यांनी पुरस्कार न मिळालेल्यांचेही विशेष कौतुक केले आणि पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली. महाराष्ट्र टाइम्समध्ये आपली स्वतःबाबत किंवा कार्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली की दिवस संस्मरणीय ठरतो, असेही त्यांनी मनोगत व्यक्त केले.
भाषणाच्या शेवटी त्यांनी ज्येष्ठ कवी विं दा करंदीकर यांच्या “चुकली दिशा तरीही…” या कवितेचा उल्लेख करत तरुणांना संदेश दिला की दिशा चुकली तरी प्रयत्न सोडू नयेत; आवश्यक असल्यास दिशा बदलता येते आणि ध्येयासाठी झटल्यास यश निश्चित मिळते.