महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अनागोंदी कारभार सुरू : संजय राऊत

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अनागोंदी कारभार सुरू आहे. तीन नेत्यांचा एकमेकांमध्ये संवाद नाही. राज्य कारभाराच्या नावाखाली बेबनाव सुरू आहे. एका मंत्र्यांनी मराठ्यांची बाजू घ्यायची, दुसऱ्या मंत्र्यांनी ओबीसीची बाजू घ्यायची, अशा प्रकारची नौटंकी सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतीही ठोस भूमिका न घेता केवळ मराठ्यांचीच नव्हे तर ओबीसींची फसवणूक करत आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित सातव्‍या युवा संसदेमध्ये संजय राऊत यांची मुलाखत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि पत्रकार संजय आवटे यांनी घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, युवा संसदेचे अध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले, अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर हे भाजपने उभारलेले नाही. तर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मंदिर समितीने हे मंदिर उभारले आहे. परंतु पंतप्रधान मोदी मात्र उपवासाचे नाटक करून देशाची दिशाभूल करत आहेत.

देशातील लोकांना जेव्हा अंगावर वस्त्र नाही, म्हणून महात्मा गांधी तसेच आयुष्यभर वावरले, त्याप्रमाणे नरेंद्र मोदी हे दररोज चटईवर झोपणार आहेत काय? असा सवाल करतानाच ही नौटंकी त्यांनी बंद करावी आणि जनतेच्या मूळ प्रश्नांकडे लक्ष द्यावे, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.

भारतीय जनता पक्षाला निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे पक्षाचे नाही, तर त्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये केलेल्या घोटाळ्याचे हे यश आहे. ईव्हीएमचा पूर्वी मी सुद्धा समर्थक होतो, परंतु मध्य प्रदेशात झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर माझी खात्री पटली आहे की ईव्हीएममध्ये भाजपाने निश्चितच घोटाळा केला आहे.

त्यामुळेच त्यांना यश मिळाले आहे. ईव्हीएम नसेल तर भाजप देशांमधील एक साधी ग्रामपंचायत निवडणूक जिंकू शकत नाही, असेही राऊत म्‍हणाले.

Leave a Comment