Braking news : मविआत जागा वाटपावरून ठिणगी

Photo of author

By Sandhya

मविआत जागा वाटपावरून ठिणगी

महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चेला तोंड फुटताच वादालाही सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी याआधी जिंकलेल्या १९ जागांवर दावा केला. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाराजी व्यक्त करीत आघाडीत अडचण निर्माण होईल अशी वक्तव्ये करणे टाळण्याचा सल्ला राऊत यांना दिला.

कर्नाटकातील सत्तांतराने उत्साह संचारलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झाली.

त्या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची समिती नेमली जाणार आहे. मात्र, त्याआधीच शिव- सेनेने लोकसभेच्या १९ मतदारसंघांवर दावा सांगितला. संजय राऊत म्हणाले, लोकसभेत आमचे १९ खासदार असतील.

गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ४ तर काँग्रेसने १ जागा जिंकली आहे. या जागा त्यांच्याकडेच राहतील. जिंकल्यानंतर कोण कुठे गेला यावर जागावाटप ठरणार नाही. महाराष्ट्रात आम्ही १८ जागा जिंकल्या होत्या आणि दादरा नगर हवेलीचा एक खासदार आमचा आहे. असे एकूण १९ खासदार आमचे असतील.

राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. मविआतील तीन पक्षांत प्रत्येकी १६ जागा वाटल्या जाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. मात्र, राऊत यांनी हा फॉर्म्युला फेटाळून लावला आहे. असा कोणताही फॉर्म्युला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment