दोन माजी महापौरांसह १५ नगरसेवकांचा लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. यात चार ते पाच माजी नगरसेवक काँग्रेसचे तर उर्वरित ठाकरे सेनेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा प्रवेश सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात घेण्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे समजते.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आतापर्यंत ठाकरे सेनेच्या १५ माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. २०१७ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या १०० टक्के नगरसेवकांना शिंदेंच्या शिवसेनेत आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या मुंबईतील पाच आमदारांना प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाही १० ते १२ माजी नगरसेवकांना घेऊन शिंदेंच्या शिवसेनेत दाखल व्हा, असे खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनच सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे पेडणेकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेश लांबल्याची चर्चा ठाकरे गटासह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुरू आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मध्य मुंबईतील अजून एक माजी महिला महापौर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होणार आहे.
या माजी महापौरांसोबत ठाकरे सेनेचे किमान १० माजी नगरसेवकही येत्या काही दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसमधून उमेदवारी कापण्याची शक्यता असलेले काँग्रेसचे चार ते पाच ज्येष्ठ नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसांत माजी महापौरांसह माजी नगरसेवकांचा धुमधडाक्यात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी तयारी सुरू आहे.