माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी

Photo of author

By Sandhya

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण

‘गुरुजींना अटक करण्याची भाषा करता तुम्हाला जगायचे आहे का’? अशा धमकीचा ई-मेल माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण  यांना आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून कराड येथील त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

नांदेडहून ईमेल आला असल्याचे सांगितले जात असून याबाबत खात्री करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान ज्याने हा मेल केला आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिली.

विधानसभेच्या अधिवेशनामध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे गुरुजींना अटक करा, असे मागणी केली होती. भिडे गुरुजी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी अनुद्गार काढले होते. त्यामुळे त्यांना अटक करावी, अशी मागणी केल्यानंतर विधानसभेत एकच गोंधळ उडाला होता.

त्यानंतर शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पृथ्वीराज चव्हाण यांना मेल करून गुरुजींना अटक करा, म्हणून बोलतो काय जिवंत राहायचे आहे का? अशी धमकी देण्यात आली आहे. रविवारी सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर ईमेल तपासणी करत असताना धमकीचा मेल आला असल्याचे त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना समजले.

त्यांनी याबाबतची माहिती आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्यानंतर त्यांनी ही बाब पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलीस माहिती घेत असून त्यांच्या कराड येथील पाटण कॉलनीतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

तसेच ई-मेल कोणाच्या मेलवरून आला आहे? ती व्यक्ती कोण आहे? मेल पाठवण्याचा उद्देश काय आहे? कुठून पाठवला आहे? पाठवणारी व्यक्ती ने डुप्लिकेट अकाउंटचा तर वापर केला नाही ना? याची माहिती पोलीस घेत असून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असल्याचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी सांगितले.

Leave a Comment