मला संपवण्यात आनंद मिळत असेल तर संपवून दाखवाच, उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

Photo of author

By Sandhya

उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

 एकेकाळी शिवसेनाप्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना वाचवले. त्याचे पांग ते असे फेडतायत. मला संपवण्यात आनंद मिळत असेल तर तुम्ही संपवा, संपवून दाखवाच, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. पण, मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. शरण जाणार नाही. जिंकेपर्यंत लढत राहीन, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

उद्धव ठाकरे यांनी ‘आवाज कुणाचा’ या ‘पॉडकास्ट’ माध्यमातून त्यांच्या मुखपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीच्या उत्तरार्धात ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गट, अजित पवार यांच्यावर टिकेची झोड उठविली. आज माझ्याविरुद्ध अख्खा भाजप आहे.

माझ्याकडचे पक्ष आणि चिन्ह चोरूनही उद्धव ठाकरेंची भीती का वाटते ? असा प्रश्न करतानाच उद्धव ठाकरे ही एकटी व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत, असे उद्धव म्हणाले. तसेच, आमच्या डोक्यात मस्ती नाही, तर आत्मविश्वास आहे.

हाच आत्मविश्वास 2024 ला हुकूमशाहीचा पराभव करील. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच खरे भाजपचे सहकारी पक्ष आहेत. त्यांची भीती दाखवूनच विरोधातले पक्ष फोडले जात आहेत. पण, मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. शरण जाणार नाही. जिंकेपर्यंत लढत राहीन, असेही ते म्हणाले.

यावेळी ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चांबाबत ठाकरे म्हणाले की, या चर्चेला आधार असता, तर माध्यमांमधील चर्चा थांबली नसती. चर्चा झाली आणि चर्चा थांबली. ज्याने चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्याला आधार मिळाला नाही, त्यामुळे ती चर्चा थांबली असेल. तसेच, मी प्रस्ताव आला तर, गेला तर यावर विचार करत नाही. 

Leave a Comment