![मल्लिकार्जुन खर्गे](https://dainikesandhya.com/wp-content/uploads/2024/04/Untitled-design-2024-04-22T110518.262.png)
‘‘भाजपचे सरकार दहा वर्षात २० कोटी लोकांना रोजगार देणार होते, मात्र या सरकारने रोजगार देण्याऐवजी १२ कोटी लोकांचा रोजगार हिसकावला आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी समाज माध्यमातून केला.
केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेत आले तर ‘रोजगारक्रांती’ आणेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
युवकांसाठी रोजगार हा निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा असल्याचे सांगून खर्गे म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी देशभर प्रचार करत आहेत. मात्र एकाही सभेत ते किती नोकऱ्या देण्यात आल्या यावर बोलत नाहीत.
‘पहली नोकरी पक्की’, ‘भारती भरोसा’ या योजना अमलात आणण्यासोबतच पेपर फुटीला आळा घालण्याची गॅरंटीही आम्ही दिली आहे. भारती भरोसा अंतर्गत ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील तर, ‘पहली नोकरी पक्की’ अंतर्गत प्रशिक्षणाचा अधिकार दिला जाईल.
प्रत्येक पदवीधारक आणि पदवीकाधारकाला वर्षात एक लाख रुपयांच्या मानधनासह नोकरी दिली जाईल. पेपर फोडणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना केली जाईल.’’
युवा रोशनी कार्यक्रमाअंतर्गत स्टार्टअप निधी योजनेची पुनर्रचना केली जाईल, असेही खर्गे यांनी सांगितले. यासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये समान पद्धतीने वितरित केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
या योजनांमुळे ४० वर्षाखालील व्यक्तींना रोजगार मिळेल असा दावा खर्गे यांनी केला. ‘‘गिग इकॉनॉमीच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा भरोसा आम्ही दिला आहे,’’ असेही खर्गे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.