
जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानाची सुरुवात झाली आहे. शनिवारी एकाच दिवशी 8 तालुक्यांतील 11 कामे सुरू करण्यात आली आहेत. पुरंदर तालुक्यातील नावळी तोरवेवस्ती या पाझर तलावातील गाळ उपसा करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. अंकित गोयल, नावळी गावचे सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
एकाच दिवसात 8 तालुक्यांतील 11 कामांचा प्रारंभ जिल्ह्यात एकाच दिवसात पुरंदर तालुक्यात नावळी, वेल्हा तालुक्यात गुंजवणे, शिरूर तालुक्यात मोराची चिंचोली, बारामती तालुक्यात बाबुर्डी, इंदापूर तालुक्यात मदनवाडी, खेड तालुक्यात जरेवडी, रासे तसेच जुन्नर तालुक्यात आणे, पोडगा व आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर, अशा 11 ठिकाणी कामे सुरू करण्यात आली.
जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग आणि जलसंपदा विभागांतर्गत 1 हजार 16 पाझर तलावांची यादी तालुकास्तरीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आली. त्यापैकी 37 कामांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.
ही कामे लवकरच सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या आठवड्यात प्रत्येक तालुक्यातून 10 कामे सुरू करण्यात येणार आहेत. ’गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानामुळे धरण व तलावातील गाळ उपसून शेतात पसरविल्यास कृषी उत्पादनात वाढ होण्यासह धरणाची व तलावाची मूळ साठवणक्षमता पुनर्स्थापित होण्यास मदत होणार आहे.