
मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील बनला आहे. राज्यात ठिकठिकाणी हिंसक आंदोलन सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
या बैठकीत थेटपणे काहीही काही निर्णय झालेला नसला तरी जरांगेंनी सरकारला वेळ द्यावा, संयम राखावा अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. या बैठकीवर प्रतिक्रिया देताना जरांगेंनी थेट फडणवीसांनाच आव्हान दिलं. त्यांनी फडणवीसांनी इथं चर्चेसाठी यावं, माझे मराठे तुम्हाला संरक्षण देतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
जरांगे म्हणाले, “आम्ही पण तयार होतो ना चर्चेसाठी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले होते की, चर्चा करु. आम्ही त्यांना चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत पण ते येत नाहीत.
पण यांना आता काड्या घालायची सवय लागली आहे. तुम्हाला किती वेळ हवा आहे ते सांगा? देवेंद्र फडणवीसांनी इथं चर्चेसाठी यावं. तुम्हाला कोणीही अडवणार नाही. माझे मराठे तुम्हाला संरक्षण देतील. आज संध्याकाळपासून मी पाणी सोडणार आहे, मग बघू ते मराठ्यांना आरक्षण कसं देत नाहीत”
शांततेत सुरु असलेल्या आंदोलनावर बोलताना यापूर्वी जरांगेंनी सरकारला आव्हान दिलं होतं की, शांततेचं युद्ध आता सरकारला पेलणार नाही. तसेच आजच्या सर्वपक्षीय बैठकीवर बोलताना जरांगे म्हणाले, “बैठकीत काय झालं याचा तपशील मिळाला नाही, गोरगरिबांच्या लेकरांकडे लक्ष न देता सरकार नुसत्या बैठका घेत आहेत. मराठा समाजाच्या लेकरांचे विनाकारण मुडदे पडत आहेत, तरी लक्ष देत नाहीत”
तुम्हाला आत्ता सुट्टी नाही, तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला वेळ कशासाठी पाहिजे आणि का पाहिजे? आणि महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? हे सांगा. तुम्हाला अर्धा तास द्यायचा की वेळचं द्यायचा नाही हे आम्ही मराठे विचार करून सांगतो. तुमच्या मनात काय आहे ते तरी कळू द्या, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.