भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. मराठा समाज तुमची मालमत्ता आहे का?, असा सवाल दरेकरांनी केला. याला उत्तर देताना मनोज जरांगे पाटलांनी भाजपमधील मराठा आमदारांना इशारा दिला. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनाही जरांगेंनी लक्ष्य केले.
“हा देवेंद्र फडणवीसांचा ट्रॅप” मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाज तुमची मालमत्ता आहे का, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. त्याला उत्तर देताना जरांगे म्हणाले की, “हा देवेंद्र फडणवीसांनी रचलेला ट्रॅप आहे.
मोठे लोक जे बोलताहेत ना, त्यांना गरीब मराठा मोठा होऊ वाटत नाही. सगळ्या संघटना फोडल्या. काही समन्वयक फोडले. भाजपतील काही मराठा आमदार बोलायला लागले. ज्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही, असाच भाजपमधील मराठा आमदार बोलायला लागला आहे.”
“त्यांना त्यांची पोरं मोठी करायची आहेत. त्याला मालमत्ता कमावायची आहे. त्याला पक्ष मोठा करायचा आहे आणि नेता मोठा करायचा आहे, तेच आमदार आमच्या विरोधात बोलत आहेत. भाजपमधील काही आमदार मेले तरी बोलू शकत नाही.
देवेंद्र फडणवीसांनी मारून टाकलं तरी बोलू शकत नाही. जातीच्या आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलूच शकत नाही”, असे जरांगे म्हणाले. “वेळ येऊ द्या, तुम्हाला…”, मनोज जरांगेंनी काय दिला इशारा? “अनेक आमदार मला भेटून गेले. त्यांनी सांगितलं की, समाजाचं कल्याण होत आहे. आमच्यावर दबाव असला तरी आम्ही बोलणार नाही.
कारण गरिबाची लेकरं मोठी व्हायला लागली आहेत. ज्यांना स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची आहे. नेता, पक्ष सांभाळायचा आहे. जात मेली तरी चालेल, असेच लोक फक्त बोलत आहेत.
आंदोलनाच्या विरोधात मराठा समाज उभा राहणार नाही. वेळ येऊद्या मराठे तुम्हाला कसे सरळ करतात, बघा”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी टीका करणाऱ्या आमदारांना दिला.