आता कोणाचीही मागणी नसताना काही जाती आरक्षणात घातल्या. तेही मराठ्यांना छेडून त्यांनी घेतले. तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देता येत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. ही जी खुन्नस दिली, त्याचे त्याचे परिणाम इतके वाईट होतील की, तुम्हाला पश्चाताप करायला वेळ राहणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी मध्यरात्री मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. दोघांमध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सोबत मुख्यमंत्री यांचे ओएसडी मंगेश चिवटे ही उपस्थित होते. अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या शेतात भेट झाली आहे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झाल आहे. आचारसंहितापूर्वी मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. दोघांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली अद्याप समजू शकले नाही. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिला आहे.
तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही मराठा आरक्षणासाठी सरकारचे काय नियोजन आहे, ते माहिती नाही. देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांवर दुर्लक्ष करू नये. पुन्हा पुन्हा दुर्लक्ष केले तर, याचे दुष्परिणाम वाईट होतील. ज्या रस्त्याकडे मराठा समाजाला जायचे नाही. त्या रस्त्याकडे फडवणीस यांच्या हट्टामुळे, मराठा द्वेषीपणामुळे, मराठ्यांना विनाकारण राजकारणाच्या रस्त्यावर यावे लागेल.
मराठा त्या राजकारणाच्या वाटेवर आला, तर तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही, अशी बोचरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. दरम्यान, आमच्या मागण्याच्याची अजून वेळ गेलेली नाही. सर्व मागण्याची अंमलबजावणी करा. तुमचे राजकारण तुमची सत्ता तुम्हाला लख लाभ असो.
मला आणि माझ्या मराठ्याला राजकारणाकडे जायचे नाही. पण तुम्ही जर मराठ्यांवर दुर्लक्ष करून अन्याय करण्यासाठी सत्ता चालवत असाल. तर माझे मराठे तुमची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. आचारसंहिता लागू द्या मग त्यांना कळेल. या राज्यातील शेतकरी, दलित, मुस्लिम आणि अठरा पगड जातीचे कर्तव्य काय त्यांच्या लक्षात येईल.
माझे पुन्हा पुन्हा म्हणणे आहे. तुम्ही मराठ्यांकडे दुर्लक्ष करून, आमचा अपमान करू नका. या राज्यात मराठ्यांच्या नादी लागलेल्याचा मराठ्यांनी बिमोड केलेला आहे. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, नसता तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय सोडणार नाही, असे जरांगे म्हणाले.