बदलापूरमधील एका शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. यानंतर या घटनेचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आज (२० ऑगस्ट) शाळेत आंदोलन केलं. तसेच बदलापूरमधील नागरिकांनी बदलापूर बंदची हाक देत बदलापूर रेल्वे स्थानकामध्येही रेल्वे रोको आंदोलन केलं.
हे आंदोलन गेल्या ७ ते ८ तासांपासून सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात येणार असल्याचंही राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, संतप्त झालेल्या नागरिकांनी बदलापूर येथे रेल्वे रोको आंदोलन करत दगडफेकीची घटना घडली. सध्या लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन हे देखील संतप्त आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत आहेत.
मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन करत आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच ज्या पोलिसांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली, त्यांना सोडलं जाणार नाही, कृपया आंदोलन थांबवा, अशी कळकळीची विनंती मंत्री महाजन यांनी आंदोलकांना केली आहे. मात्र, आंदोलकांकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? “गेल्या ६ ते ७ तासांपासून आंदोलन सुरु आहे. आंदोलनामुळे रेल्वे देखील ठप्प झाली आहे. अनेक रूग्णही अडकले आहेत. राज्य सरकार या घडलेल्या घटनेबाबत अतिशय गंभीर असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात येणार आहे.
त्या शाळेच्या संबधित कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल करायला वेळ लावला त्यांच्यावरही कारवाई होणार आहे”, असंही आश्वासन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं.
“एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तसेच यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील लक्ष घालत आहेत. त्यामुळे आता जवळपास ७ ते ८ तास झाले आहेत. रेल्वेने प्रवास करणारे लाखो लोकांचीही आपण काळजी घेतली पाहिजे. या सर्व प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांना सोडलं जाणार नाही. ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वेळकाढूपणा केला त्यांच्यावरही कडक कारवाई होईल.
कोणालाही सोडलं जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. गेल्या ७ ते ८ तासांपासून रेल्वे ठप्प आहे. अनेक लोक अडकलेत. त्यामुळे सरकारची विनंती आहे की आपण आंदोलन थांबवावं. आंदोलकांनी समजून घ्या, शाळेकडून माफिनामा जाहीर आणि मुख्यध्यापिकेचं निलंबन करण्यात आलं आहे, तुम्हाला जे हवं ते होईल. पण कृपया आंदोलन थांबवा”, अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना केली आहे.