मंत्री नितीन गडकरी : भविष्यात बेळगाव जिल्हा बनणार इथेनॉल उत्पादनाचे हब…

Photo of author

By Sandhya

मंत्री नितीन गडकरी

ऊस पीक आता केवळ साखर उत्पादनासाठी मर्यादित राहिले नाही. उसाद्वारे इथेनॉल उत्पादन मोठ्या स्वरुपात घेतले जात आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील मोठे ऊस उत्पादन पाहिल्यास भविष्यात बेळगाव इथेनॉल उत्पादनाचे हब होऊ शकते. त्यासाठी कर्नाटक राज्य शासनाकडून व्यापक प्रयत्न अपेक्षित असल्याचे केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

बेळगाव जिल्ह्यातील १,६२२ कोटी रुपये खर्चून होनगा-झाडशहापूर चौपरी रिंगरोड, ९४१ कोटी रुपये खर्चून चिक्कोडी बायपास ते गोटूर चौपदरी रस्ता,

शिरगुप्पी ते अंकलीपर्यंत ८८७ कोटी रुपये खर्चून तर रस्त्याचे रुंदीकरण असे मिळून १३ हजार कोटी रुपये खर्चून ६८० किलोमीटर लांबीच्या रस्ता कामांना गुरुवारी गडकरी यांनी चालना दिली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा क्रीडांगणावर हा कार्यक्रम झाला.

बेळगावातील रिंगरोड संदर्भात कित्येक वर्षांपासून चर्चा सुरू होती. मात्र, आता त्याची वेळ जुळून आली आहे. बेळगावातील बायपास रस्त्यामुळे बेळगाव ते गोवा आणि बेळगाव-हुनगुंद-रायचूर या महामार्गामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

बेळगाव ते संकेश्‍वर महामार्गाला वन विभागाची वेळेत अनुमती न मिळाल्यामुळे काम रखडले आहे. राज्य सरकारने यातील अडथळे दूर करून कामाला चालना द्यावी, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.

मंत्री गडकरी म्हणाले, ‘‘देशभरातील ग्रीन कॉरिडॉर महामार्गाच्या विकासाला केंद्र सरकार प्राधान्य देत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. पर्यावरणपूरक महामार्गाची निर्मिती होईल. बेळगावात ऊस उत्पादन जादा घेतले जाते.

उसापासून इथेनॉल निर्मितीमुळे अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. इथेनॉल उत्पादन वाढविले आणि इथेनॉल पंप सुरु केल्यास वाहनधारकांना केवळ साठ रुपयांत इंधन मिळू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल. शेतकरी आणि पर्यावरणाचे संवर्धन होईल.

यामुळे राज्य सरकारने बेळगाव जिल्ह्यात इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. काही दिवसांत भारत जगाला इथेनॉल निर्यात करेल. भविष्यात इथेनॉल व मिथेनॉलवर आधारित वाहने रस्त्यावर आणून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासह पर्यावरण संवर्धनावर भर दिला जाईल.’’

यावेळी यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, खासदार मंगला अंगडी यांची भाषणे झाली. खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार अभय पाटील, विठ्ठल हलगेकर, प्रकाश हुक्केरी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page