सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी पार पडली. शिंदे-फडणवीस सरकारला तुर्तास दिलासा मिळाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात आपापली वर्णी लावण्यासाठी सगळे आपल्या गॉडफादरच्या मागे लागलेले असतानाच ‘तुम्हाला मंत्री व्हायचे का, मग आम्हाला पैसे द्या” मी भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा पीए बोलतोय! या प्रकारची बतावणी करीत थेट आमदारांनाच गंडा घालणाऱ्या एका ठकबाजाला नागपुरच्या तहसील पोलिसांनी गुजरात अहमदाबाद मधील मोरबी येथून अटक केली आहे. नीरज सिंग राठोड असे या तोतया पीएचे नाव आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांची नावे नाहीत, असे काही आमदार या आमिषाला बळी पडले आहेत. मध्य नागपुरातील भाजप आमदार विकास कुंभारे यांना नगर विकास मंत्रालयाचे आमिष देण्यात आले. यासाठी 1 कोटी 67 लाख रुपये मागण्यात आले. मात्र, कुंभारे यांना फसवणुकीचा संशय आल्याने त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना माहिती दिली.
आयुक्तांच्या निर्देशानुसार तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करीत या भामट्याला अटक केली. आमदारांना फोन आलेल्या मोबाईन क्रमांकावरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला. पोलिसांचे पथक त्याला घेऊन आज नागपुरात पोहोचण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या भामट्याने आपण राष्ट्रीय अध्यक्ष यांचा पीए असल्याचे सांगतानाच दुसऱ्या एका मित्राच्या मदतीने नड्डा बोलत असल्याचे वेळोवेळी भासवले. त्याच्या मोहजाळात अडकलेल्या आमदारांशी तो या तोतया नड्डा यांच्याशी बोलणे करून देत होता.
विदर्भातील अनेक आमदार त्याच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळत आहे. यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, हिंगोलीचे तानाजी मुटकुळे, बदनापूरचे नारायण कुचे, नंदुरबारचे राजेश पाडवी, गोवा येथील प्रवीण आर्लेकर व नागालँड येथील बाशा मोवाचंग यांसह अन्य आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवत काही पैसे देखील घेतल्याची माहिती मिळत आहे. या भामट्याचे राजकीय वर्तुळात कुणाशी लागेबांधे आहेत का, याचा पोलिस आता तपास करीत आहेत. नागपुरात आणल्यानंतर अधिक तपासात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.