महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत आता सर्वांनाच प्रश्न पडला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांना साथ देऊन भाजपाच्या साथीने सरकार स्थापन झाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेकांना अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही.
भाजपमध्येसुद्धा अनेक इच्छुक आमदार उत्सुक आहेत ज्यांना मंत्रिपदाची आशा आहे; पण शिंदे आणि फडणवीस सरकारला सत्तेवर येऊन कित्येक महिने झाले तरी अजूनही या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार झालेला नाही. या सरकारला पाठिंबा देणारे आणि शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषद घेऊनच 20 जानेवारीच्या आसपास विस्तार होईल, अशी तारखेची घोषणा केली होती. मात्र सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केलेला नाही. यावरूनच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता.
आता शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या 15 मे नंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनीही या मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दिला आहे.
त्यामुळे यावेळी हा मंत्रिमंडळ विस्तार नक्की होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले तेव्हा जवळजवळ महिनाभर या मंत्रिमंडळामध्ये शिंदे आणि फडणवीस हे दोनच मंत्री होते. त्यानंतर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला.
ज्यामध्ये दोन्ही गटातील नऊ-नऊ आमदारांना संधी देण्यात आली. त्यामुळे सध्याच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळात शिंदे आणि फडणवीस यांच्यासह एकूण वीस मंत्री आहेत. विधानसभेतील आमदारांची संख्या 288 असल्याने नियमाप्रमाणे मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त 43 असू शकते म्हणजे अजून किमान 23 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. सत्तेच्या समान सूत्रामुळे भाजपच्या 10 आमदारांना आणि शिंदे गटातील 10 आमदारांना संधी मिळणे अपेक्षित आहे. पण अद्यापही शिंदे आणि फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतलेला नाही.