मराठा आरक्षण आंदोलन पेटलं; अजित पवारांचे दोन शिलेदार देणार राजीनामा?

Photo of author

By Sandhya

अजित पवारांचे दोन शिलेदार देणार राजीनामा?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.

अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी देखील करण्यात आली आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे.

यादरम्यान शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे, यानंतर अजित पवार गटातून देखील दोन आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

हेमंत पाटील काय म्हणालेत? हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून खासदारकीचा राजीनामा दिला.

त्यांनी पत्रामध्ये म्हटलं की, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत.

मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.

हेमंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी देखील राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. तालुक्यातील समाज बांधव आणि मराठा समाजाच्या संघटना जसं सांगतील तसा निर्णय मी घेणार आहे, असे अतुल बेनके म्हणाले.

अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देखील राज्याचं राजकारण मराठा समाजाच्या हातामध्ये होतं. केंद्रामध्ये देखील मराठा समाजाचे अनेक मंत्री होते.

पण आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी भूमिका घेतली नाही. त्यामुळे मराठा समाजाकडून होणारी राजीनाम्याची मागणी ही योग्य असं मत व्यक्त केलं आहे.

मराठा समाजाची भावना लक्षात घेता आमच्यातील काही नेत्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे, असेही मोहिते पाटील म्हणाले. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

तसेच मराठा आरक्षणासाठी खासदारांनी संसदेत, तर आमदारांनी विधानसभेत आवाज उठवावा. परंतु केवळ लोकांचे समाधान व्हावं, तसं बोलून राजीनामा देण्याची भाषा करावी आणि भुमिका वेगळी घ्यावी हे पटत नाही.

आमदारकी आणि खासदारपदाचा राजीनामा देणाऱ्या नेत्यांना संधीसाधुची उपमा देत दिलीप मोहिते पाटीलांनी निशाना साधला.

Leave a Comment

You cannot copy content of this page