पिंपरी : कुदळवाडी मध्ये गोडाऊनला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशमन दलाची नऊ वाहने घटनास्थळी पोहोचली आहेत. काही किलोमीटर अंतरावरून धुरांचे लोट दिसत असल्याने ही आग मोठी असल्याचं बोलले जात आहे. कुदळवाडीत अनेक अनाधिकृत गोडाऊन आहेत. भंगार व्यावसायिकांवर कारवाई करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु, चिरीमिरीसाठी महापालिकेचे अधिकारी अनाधिकृत आणि बेकायदेशीर गोडाऊनवर कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे. कुदळवाडीमध्ये नेहमीच आगीच्या घटना घडतात. आज सकाळी दहाच्या सुमारास चिखली-कुदळवाडी येथे गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण नऊ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दल करत आहेत. चिखलीमध्ये मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसाय आणि गोडाऊन असल्याने त्या ठिकाणी नेहमीच आग लागते. यावर महानगरपालिकेने कायमचा तोडगा काढणे देखील गरजेचे आहे. कारण आजूबाजूला नागरी वस्ती आहे. अनेक नागरिक हे चिखली परिसरात राहतात. या आगीच्या धुरापासून त्यांच्या आरोग्याला धोका देखील उद्भवू शकतो हे नाकारता येत नाही.