
मुंबई – मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आले आहेत. मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही हे तपासून घ्यायला हवं अशी शंका शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे.
रोहिणी खडसे यांनी ट्विट करत यावर मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, कालपासून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पक्षाला विविध इशारा दिले जात आहेत. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. बंधू राज साहेब, मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावगं आहे. कारण याआधीही मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आले आहेत. तुम्ही एकदा तपासून घ्यावे मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही असं त्यांनी म्हटलं आहे
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि भाषिकांवर होणाऱ्या हल्ल्याची दखल घेत जिथं अन्याय दिसेल तिथे कानफाडात बसलीच पाहिजे असं विधान केले. त्याशिवाय बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातोय की नाही हे तपासा असं कार्यकर्त्यांनी सांगितले. राज यांच्या भाषणानंतर राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून बँकांमध्ये निवेदन देण्यात आले. त्यात काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी हिंसेचा वापर केला. त्यानंतर मराठी-अमराठी वाद पुन्हा उफाळून आला. राज ठाकरे हे हिंदूविरोधी आहेत असं म्हणत उत्तर भारतीय विकास सेनेने मनसेची मान्यता रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली. त्यानंतर राज ठाकरेंवर चौफेर टीका करण्यात येत आहे. मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनाही अज्ञात व्यक्तीने फोन करत धमकी दिल्याचं समोर आले. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा चर्चेत आली आहे.
दरम्यान, मनसेची मान्यता रद्द करावी म्हणून कुठला तरी भैय्या म्हणे कोर्टात गेला आहे. मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्ये प्रयत्न करणार असतील तर भय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल. आमचा पक्ष राहावा की राहू नये हे आता भय्ये ठरवणार का? त्या याचिकेमागील षड्यंत्र तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे षड्यंत्र आहे. हे भाजपाचे षड्यंत्र आहे. हे लोक भाजपाचेच पिट्टू आहेत. भाजपावाले यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.