
बारामती शहरातील मिशन बॉइज होम येथून बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय मुलाचा नीरा डाव्या कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. ४८ तासानंतर या मुलाचा मृतदेह बांदलवाडी येथे मिळून आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर मिशन बॉइज होमच्या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राजवीर विरधवल शिंदे (वय १५) असं या मृत मुलाचं नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १८ फेब्रुवारी रोजी राजवीर शिंदे हा आपल्या काही मित्रांसह बारामती येथील चर्च ऑफ ख्राईस्ट मिशन बॉइज होममध्ये काहीही न सांगता बारामती शहरातील नटराज कलामंदिरशेजारी असलेल्या नीरा डाव्या कालव्यावर फिरण्यासाठी गेला होता.
हे सर्वजण आंघोळीसाठी कालव्यात उतरले असता राजवीर हा पोहता येत नसल्यामुळे पाण्यात वाहून गेला. या घटनेनंतर पोलिसांसह बारामती नगरपरिषदेच्या यंत्रणेकडून दोन दिवसांपासून या मुलाचा शोध घेण्यात येत होता. आज त्याचा मृतदेह बांदलवाडी येथे कालव्यात आढळून आला. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक्षकाची मनमानी
दरम्यान, बारामतीतील मिशन बॉइज होमचे अधीक्षक रॉबर्ट गायकवाड हे मुलांना त्रास देतात. त्यांना शासनाच्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे येथील मुले जाचाला कंटाळून संस्थेतून निघून जात आहेत असा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही संस्थेच्याच सदस्यांकडून करण्यात आली आहे.