बारामतीमध्ये आदर्श आचारसंहिता लागू

Photo of author

By Sandhya

Model code of conduct implemented in Baramati

Code of Conduct text on notebook. Concept of ethical integrity, value and ethics.

संबंधित प्राधिकरणाची परवानगी आवश्यक ; नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई

बारामती – भारत निवडणूक आयोग,नवी दिल्ली यांचे आदेश दिनांक 15/03/2026,मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य,मुंबई यांचे निर्देश तसेच जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,पुणे यांचे आदेश यांच्या अनुषंगाने दिनांक 15/03/2026 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली असून याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की,

आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष,पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिकांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
आचारसंहितेच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी सभा,मोर्चे,प्रचार रॅली,मिरवणुका, ध्वनीक्षेपकाचा वापर, बॅनर,पोस्टर,फ्लेक्स किंवा भित्तीपत्रके लावणे यासाठी संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

परवानगीशिवाय असे कार्यक्रम आयोजित करणे, सार्वजनिक संपत्तीवर अनधिकृत जाहिराती लावणे,मतदारांना पैसे,भेटवस्तू किंवा इतर कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे,जातीय अथवा धार्मिक भावना भडकविणारी वक्तव्ये करणे किंवा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होईल अशी कोणतीही कृती करणे हे कायद्याने दंडनीय आहे.

तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा,चुकीची माहिती किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे टाळावे.

अशा प्रकारचे कृत्य आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून विशेष गस्त,नाकाबंदी, वाहन तपासणी मोहीम तसेच इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

त्यामुळे बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रभारी पोलीस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन
जि.पुणे

Leave a Comment

You cannot copy content of this page