PUNE : मोठी आग, दहा गुंठ्याचे गोदाम जळून खाक

Photo of author

By Sandhya

उरुळी देवाची येथील प्लायवूड व त्याची कटिंग मशिनरी तसेच होम अप्लायन्सेसच्या गोदामाला मोठी आग

शहरात गोदामांना आग लागण्याचे सत्र सुरूच असून, रविवारी पहाटे उरुळी देवाची येथील प्लायवूड व त्याची कटिंग मशिनरी तसेच होम अप्लायन्सेसच्या गोदामाला मोठी आग लागली.

या आगीत दहा गुंठ्याचे गोदाम जळून खाक झाले. यात जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही. टिंबर मार्केट येथील गोदामे, गंगाधाम येथील 22 गोदामांना लागलेल्या आगीनंतर महिनाभरातील आगीची शहरातील ही तिसरी घटना आहे.

उरूळी देवाची येथील गोदामाला पहाटे आग लागल्याचे समजल्यानंतर 3 वाजून 27 मिनिटांनी अग्निशमन दलाला कॉल देण्यात आला. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या आगीच्या ठिकाणी पोहोचल्या. आग मोठी असल्याने तब्बल आठ गाड्या आगीच्या ठिकाणी दाखल झाल्या आणि ही आग आटोक्यात आणली.

पहाटे चार वाजता देवाची ऊरळी, मंतरवाडी येथे दोन गोदामाला आग लागली. गोदामात प्लायवूड होते. प्लायवूड कटिंगची मशिनरी ही पाच गुंठ्याच्या गोदामात होती. त्याच्याच लगत 5 गुंठ्याच्या गोदामात होम अप्लायन्सेस होते. या दोन पाच-पाच गुंठ्याच्या गोदामामध्ये पार्टिशन होते. ही आग एवढी मोठी होती की, काही वेळेत सर्व साहित्य जळून खाक झाले. मोठ्या प्रमाणात भांडी व यंत्रसामग्रीचे नुकसान झाले.

प्रवीण ओसवाल, निखिल ओसवाल, विनोद ओसवाल यांच्या मालकीचे हे गोदाम होते. पीएमआरडीएचे दोन, कात्रज, कोंढवा, काळेपडळची मिळून सहा अशी आठ अग्निशमन वाहने व जवानांकडून आग आटोक्यात आणण्यात यश आले. उरुळी देवाची येथील सासवड रस्त्याच्या शेजारी लक्ष्मी हॉटेल आहे. त्याच्या मागील बाजूस 10 गुंठ्यांचे हे गोडाऊन आहे.

यापूर्वी लागलेल्या आगीत दोघांचे जीवही गेले होते. या परिसरात काही वर्षांपूर्वी पहाटेच्या दरम्यान साडीच्या गोडाऊनला मोठी आग लागली होती. त्यामध्ये आगीत मोठे नुकसान होऊन 2 लोकांचे जीवही गेले होते. या अशा आगी लागण्यामागे प्रशासनाचे ऑडिट कडे दुर्लक्ष असल्याचे समोर येत आहे. याचप्रमाणे गोडाऊन मालकांनीही आगीपासूनच्या सुरक्षितेसाठी नियोजन करणे गरजेचे आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page