राज्यात रोज नवीनवीन राजकीय घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या फुटीनंतर अजित पवार गटाने मंत्री काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर आज महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार गटाचे सर्वच आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
आजपासून राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे, या पार्श्वभूमिवर राज्यात वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. काल शरद पवारांची अचानक भेट घेतल्यानंतर अजित पवार गटाचे सगळे आमदार आणि मंत्री पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेणार आहेत.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही भेट होणार आहे. या मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सेंटरमध्ये भेटीसाठी जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज सभागृहासाजे कामकाज आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. दरम्यान, शरद पवार हे आपल्या सिल्वर ओक निवासस्थानावरुन यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले.
त्यामुळे राज्यात आता नेमकी काय घडामोड घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काल अजित पवार यांच्यासह नव्याने मंत्री झालेले सर्व नेते शरद पवार यांच्या भेटीला गेले होते.यावेळी त्यांनी झालेल्या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.
मात्र त्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. आम्ही शरद पवार यांच्या पाया पडून आम्ही त्यांचे आशिर्वाद मागितले आणि त्यांना विनंती देखील केली, आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच,
तसेच राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहू शकतो याबद्दल त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावे असी विनंती देखील केली, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. त्यावरही पवारांनी मौन बाळगले असल्याचे त्यांनी सांगितले होते.