शिवसेना महाराष्ट्रात वाढली, ठाणे, कोकण, संभाजीनगर हे शिवसेनेचे बालेकिल्ले अबाधित राहिलेत. कोणी म्हणत होते ठाणे, कल्याणमध्ये शिवसेनेचा पराभव होईल, पण दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला. हा विजय घासून नाही तर ठासून विजय आहे.
कोकणात ठाकरे सेनेला एकही जागा जिंकता आलेली नाही, महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. एकनाथ शिंदे आज शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त वरळी डोम येथे सभेत बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले ?
“आज शिवसेनेला 58 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे माझ्या मनामध्ये वेगळा आनंद आहे. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि मराठी माणसांसाठी न्याय हक्क मिळावा, नोकऱ्या मिळाव्या यासाठी लढा दिला. त्यानंतर पुढे शिवसेनेची भूमिका वाढत गेली. शिवसेना पूर्ण देशभरामध्ये हिंदुत्वाचा गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली.
आज शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आहे. आज ठाणे, कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना वाढली आहे. आपण या निवडणुकीत शिवसेनेचे बालेकिल्ले अबाधित ठेवले आहेत. ठाणे, कल्याण, छत्रपती संभाजीनगर आपण जिंकले आहे.
दुसरीकडे कोकणात ठाकरे गटाला एकही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला. त्यामुळे मनापासून सर्वासमोर मी नतमस्तक होतो”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
बंद पडलेले प्रकल्प सुरू केले – शेतकऱ्यांसाठी, महिलांना ताकद देण्यासाठी, तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. एकही कारखाना वापस जाता कामा नये, असे बैठकीत उदय सामंत यांना सांगितल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. आमच्या सरकारने बंद पडलेले सर्व प्रकल्प सुरू केले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. वारीतील प्रत्येक दिंडीसाठी 20 हजार रुपये घोषित केले आहेत.
काँग्रेस गळकं घर, जनता पुन्हा तिकडे जाणार नाही – जनता एकदा खोट्या प्रचाराला बळी पडली. परंतु ही जनता आता पुन्हा बळी पडणार नाही. भूल ही एकदाच देता येते. परंतु ती भूल उतरल्यानंतर खरे समोर येत असल्याचेही शिंदे म्हणाले. काँग्रेस हे गळकं घर आहे. त्यामुळे एकदा भूल पडलेली ही जनता पुन्हा त्या गळक्या घरात जाणार नाही.
आम्ही कधीही जात पात पाहिली नाही. परंतु निवडणुकीत जातीपातीचा चुकीचा प्रचार करण्यात आला. खोटं नरेटिव्ह सेट करण्यात आलं. आम्ही हे विरोधकांचं नरेटिव्ह खोडून काढण्यात कमी पडलो, मात्र ही जनता पुन्हा खोट्याला बळी पडणार नसल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.
खरी शिवसेना कोणाची हे जनतेने या निवडणुकीत दाखवून दिलं आहे, शिवसेनेचे मूळ मतदारांपैकी 19 टक्के मतं मिळाली तर चार टक्के मत त्यांच्याकडे राहिली. मग त्यांचे उमेदवार कसे निवडून आले हे सर्वांना माहित आहे. पण ठाकरेंची हा विजय तात्पूरती सूज आहे.
पण सूज काही काळाने उतरते असा टोला शिंदे यांनी लगावला. तेरा जागा शिंदे गट आणि उबाठा समोरासमोर लढले त्यात सात जागा आपण जिंकलो. आपला स्ट्राईक रेट 47 टक्के आहे. तर त्यांचा स्ट्राईक रेट आहे 42 टक्के.
त्यांना तेरा जागेवर 7 लाख मतं मिळाली. तर आपल्या तेरा उमेदवारांना 62 लाखं मतं मिळाली अशी आकडेवारीही मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडली. त्यामुळे त्यांच्यापेक्षा खरी शिवसेना कोण हे हे स्पष्ट झालं आहे.