छत्रपती शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात आली असून ती छत्रपती शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत. हा क्षण राजधानी सातारा आणि तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.
मात्र या वाघनखांवरून संभ्रम तयार करणाऱ्या विरोधकांना याचे महत्त्व कळणार नाही, शिवरायांच्या खऱ्या वाघांचे महत्त्व नकली वाघांना काय कळणार ? असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. ऐतिहासिक वाघनखे लंडनच्या गिल्बर्ट संग्रहालयातून साताऱ्याच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी संग्रहालयात दाखल झाली.
या वाघनखांच्या अनावरण आणि शिवाजी संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,
भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, शिवाजी संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक प्रवीण शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत सहाय्यता कक्ष अधिकारी मंगेश चिवटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या दुसऱ्या मजल्यावर स्वतंत्र चार कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यापैकी एका कक्षामध्ये वाघनखे ही काचेच्या पेटीत सुरक्षित ठेवण्यात आलेली आहेत. या वाघनख्यांचे अनावरण व शिवाजी संग्रहालयाचे उद्घाटन झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून जाहीर केले.
त्यानंतर पत्रकारांची काही मिनिटे संवाद साधताना ते म्हणाले, राज्य सरकारने लंडनच्या गिल्बर्ट संग्रहालयाशी संपर्क करून ही ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात सात महिन्यासाठी आणली आहेत. संपूर्ण सातारा आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. या वाघनख्यांच्या संदर्भात प्रतिकात्मक वाघनखे म्हणून संभ्रम तयार केला जात आहे.
मात्र हा क्षण उत्सवाचा आणि अभिमानाचा आहे, वाघ नख्यांविषयी वेगळी वक्तव्य करणाऱ्या नकली वाघांना छत्रपती शिवरायांच्या असली वाघांचे महत्त्व काय करणार ? असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विरोधकांचा समाचार घेतला ते म्हणाले वाघ नख्यांविषयी आक्षेप घेणारे विरोधकांना त्याचे महत्त्व समजून घेण्याची बौद्धिक कुवत नाही.
संग्रहालयाच्या दर्शनी भागामध्ये ऐतिहासिक खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. संग्रहालयाचा परिसर सुशोभित करण्यात आला होता, तत्पूर्वी शिवतीर्थ परिसरामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला फुलांनी सजवण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, पोवई नाका जवळ पंधरा मिनिटे वाहतुकीसाठी थांबवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर पत्रकार आणि पोलीस यांच्यात प्रचंड रेटारेटी झाली.
यामध्ये भाजपच्या महिला सदस्यांना विनाकारण गर्दीत चेंगराचेंगरीचा मनस्ताप सोसावा लागला. पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने रांगेत येण्याचे आवाहन केले होते. मात्र वृत्तांकनाच्या दृष्टीने संग्रहालयात जाण्याची घाई झालेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली.