मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पुण्यात ड्रग्‍ज विकणार्‍या पबवर बुलडोजर चालवा…

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यातील ड्रग्‍ज प्रकरण समोर आल्‍यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ॲक्‍शन मोडवर आले आहेत. पुण्यात ड्रग्‍ज विकणाऱ्या पबवर बुलडोजर चालवण्याचे आदेश त्‍यांनी दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना त्‍यांनी दिले आहेत. त्‍यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्‍याचे दिसून येत आहे.

दोन मुली ड्रग सेवन करतानाचा व्हिडीओ व्हायरल
निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ पब सुरू ठेवल्याने व शिवाजीनगर येथील ‘एल-थ्री’ पबमध्ये ड्रगसेवन केले जात असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका मॉलमधील शौचालयात दोन मुली ड्रग सेवन करीत असल्याचा व्हिडीओ माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.

त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्‍यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्‍याचे दिसून आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी ड्रग्‍ज विकणाऱ्या पबवर बुलडोजर चालवण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही त्‍यांनी पोलिसांना दिले आहेत.

पोलिस संथ का बसले आहेत?
व्हायरल झालेला व्हिडीओ एका मॉलमधील असल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात आला आहे. सलग दुसर्‍या दिवशी दुसर्‍या ठिकाणचा ड्रगसेवनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिस तसेच उत्पादन शुल्क विभागाचे नेमके काय सुरू आहे? असा सवाल समाज माध्यमांत उपस्थित होऊ लागला आहे. या व्हिडीओबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

पुण्यात ड्रग्सचे प्रमाण अटकेपार
फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लीझर लाउंज (एल-3) पबमध्ये पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा प्रकार एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आला होता.

हडपसर येथील एका बारमधील पार्टी संपवून रात्री दोन वाजता पुन्हा हा पब उघडण्यात आला. पहाटेपर्यंत हा पब सुरू होता. त्या पार्टीत एका बाथरूममध्ये काही मुले ड्रग्ज सेवन करीत असल्याचे देखील व्हिडीओमध्ये आढळून आले होते.

‘पब्स’ना आधार कुणाचा? कानाडोळा का?
या प्रकारानंतर आता विमाननगर येथील एका मॉलमधील एका शौचालयात दोन तरुणी मोबाईलवर अमली पदार्थसदृश पांढरी पावडर घेऊन ती चाटत असल्याचे आढळून आले आहे. या वेळी एका महिलेला तरुणींच्या कृत्याबाबत समजल्यानंतर त्या महिलेने तरुणींना हटकले, तरीही त्या मुली ड्रग्ज सेवन करण्यात मग्न असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

हा व्हिडीओ त्याच महिलेने रेकॉर्ड केला असून, महिलेचा व्हिडीओ नीट न येण्यासाठी तरुणींनी मोबाईलला हात आडवा केल्याचाही प्रकार व्हिडीओत दिसून येत आहे. गडबडीत ड्रगसेवन केल्यानंतर मुली लगबगीने बाहेर पडल्या. यामुळे पुन्हा एकदा पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागावर टीकेची झोड उठली आहे.

Leave a Comment