लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राहुल गांधींनी केलेल्या आरक्षणाच्या वक्तव्यावरुन राजकीय खळबळ उडाली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद भारताच्या राजकारणात उमटले आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला असून आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, विदेशात जाऊन सातत्याने भारताची येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला.
आरक्षण संपवण्याचा मनसुबा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे.
शिवसेना व महायुतीतील सहकारी पक्ष आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आरक्षण संपवू देणार नाही, याची ग्वाही पुन्हा या निमित्ताने देत आहोत. आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू. आपला भारत देश ही ‘फेअर प्लेस’ नाही, असे परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसमोर बोलणं हे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत अवमानकारक आहे.
राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत, हे या निमित्ताने सिद्ध होते, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याचबरोबर, अनेक सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपल्या बुद्धितेजाने लोकांची मने जिंकली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून ते आजच्या आयटी क्षेत्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत भारताचा ध्वज उंचावला आहे.
त्या सगळ्यांचा अवमान राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचा, आमच्या अस्मितांचा आणि नागरिकांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि मान्यही होणार नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो, असेही एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.