
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतोय, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाघनखांबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
दरम्यान, त्यांनी बोलताना एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी,”भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार” असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे.
भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भिती वाटेल.” असे त्यांनी म्हटले.
वाघनखांविषयी बोलताना,”आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला स्वतः गेले. वाघनखं आहेत, त्याला इतिहास आहे. ती वाघनखं आपल्या देशात, आपल्या राज्यात आणणं हे प्रत्येक देशवासियासाठी गौरवास्पद, अभिमानास्पद आहे आणि प्रत्येकाला हेवा वाटावा असं देशासाठी अभिमानाचं काम आहे.
पण दुसरीकडे काही लोक, ज्यांना विरोध, द्वेष, मत्सर सरकारच्या प्रत्येक कामावर व्यक्त करतात. त्यांनीच वाघनखांबाबत आक्षेप व्यक्त केला आहे. शंका व्यक्त केली आहे. हे दुर्दैवी आहे. पण हे शंका व्यक्त करणारे लोक आहेत, त्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतोय.
सांस्कृतिक कार्य विभाग काम करेल, वाघनखं येतील आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वस्तू आणण्याचा आम्ही प्रयत्न करू.”, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, मराठा समाजाच्या मुलांचे भलं होऊ नये, असं सरकारचं षडयंत्र आहे त्याचसाठी आरक्षण दिलं जात नाहीये असा गंभीर आरोप उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी केला आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरिबांची गरज उरलेली नाही अशी टीका त्यांनी केली. 29 ऑक्टोबरला मराठा आंदोलनकर्त्यांची बैठक घेत पुढील दिशा ठरवली जाईल असे जरांगे म्हणाले. याविषयी मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलं.