
मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या सामन्यातच एक फटका बसणार आहे. मुंबईचा पहिला सामना २३ मार्चला चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध चेन्नईच्या चेपक मैदानात होणार आहे. गेल्या हंगामात साखळीतील शेवटचा सामना खेळताना मुंबईकडून आवश्यक ती षटकांची गती राखली गेली नाही आणि याचा फटका हार्दिक पांड्याला बसला आहे.
आयपीएल २०२४ च्या मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या लीग सामन्यानंतर हार्दिकवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. पण, तेव्हा मुंबईचा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला नव्हता. अशा परिस्थितीत ही बंदी संघाच्या पुढील सामन्यापर्यंत पुढे ढकलली जाते. तसंच आता होणार आहे. नवीन हंगामातील पहिल्या सामन्यात आधीच्या कारवाईची अंमलबजावणी होणार आहे. आयपीएलच्या नियमानुसार, एकाच संघाने हंगामात तीनदा षटकांची आवश्यक गती राखली नाही तर कर्णधारावर एका सामन्याची बंदी लादण्यात येते. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील शेवटच्या आयपीएल २०२४ च्या ग्रुप स्टेज सामन्यानंतर हार्दिक पंड्याला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता आणि त्याला आयपीएल २०२५ मधील फ्रँचायझीच्या पहिल्या सामन्यातूनही निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे, परंतु गेल्या हंगामापूर्वी फ्रँचायझीने त्याच्यापासून वेगळे होऊन हार्दिकला संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले होते, अशा परिस्थितीत हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव संघाची कमान सांभाळू शकतो. सूर्यकुमार यादव हा भारतीय टी-२० संघाचा कर्णधार देखील आहे.
आयपीएल २०२४ हा मुंबई इंडियन्ससाठी खूप वाईट हंगाम होता. विशेषतः कर्णधार हार्दिक पांड्यासाठी, कारण मुंबई इंडियन्स संघ १४ पैकी फक्त ४ सामने जिंकून गुणतालिकेत तळाला राहिला होता. तसेच हार्दिकला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागले होते.