
मध्य मुंबईतील अत्यंत मोक्याची जवळपास २ एकर जागा परस्पर विकणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने जागेवर हक्क असणाऱ्या तिच्या चुलत भावंडांना कसलीही कल्पना न देता हा भूखंड एका बांधकाम व्यवसायिकाला विकला आहे.
या प्रकरणात अन्य काही नातेवाईक सहभागी असण्याची शक्यता आहे. ही जागा तब्बल १०० कोटी रुपयांची आहे. या महिलेचे नाव अबिदा जाफर इस्माईल असे असून तिच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ही महिला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अबिदाचा चुलत भाऊ अय्याज कपाडिया यांनीही ही तक्रार दिली आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटले आहे.
अय्याजचे दिवगंत वडील जाफर कपाडिया आणि जाफर कपाडियाचे भाऊ लतिफ कपाडिया यांच्या नावावर ही जागा आहे. ही जागा परळ येथे आहे. सध्या या जागेवरील इमारतीत भाडेकरू राहातात.
या प्रकरणात आबिदा आणि इतर काही नातेवाईकांनी या स्थावर मालमत्तेची पूर्ण मालकी त्यांच्याकडे आहे असे भासवत एका बांधकाम व्यावसायिका ही जागा विकली.
या प्रकरणात अमिना उस्मान हिच्याकडे पॉवर ऑफ अॅटर्नी होती, आणि तिने संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून साडेतीन कोटी रुपये रक्कम स्वीकारली आहे.
हीच स्थावर मालमत्ता यापूर्वीही विकण्याचा प्रयत्न संबंधितांनी केला होता, पण हा व्यवहार होऊ शकला नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.