पुणे शहराची वेगवेगळ्या माध्यमांतून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे. मात्र, पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही, त्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि शहरात मेट्रोचे जाळे उभे करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणे, याला प्रामुख्याने प्राधान्य राहील, असे प्रतिपादन भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी दै. ‘पुढारी’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. प्रामुख्याने पुण्यातील कोणत्या प्रश्नांना प्राधान्य राहील, अशी विचारणा केली असता त्यांनी स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक असतात, धोरणात्मक निर्णय राज्याच्या पातळीवर आमदारांच्या माध्यमातून होत असतात.
पण, खासदार म्हणून संपूर्ण शहर म्हणून महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करणे आवश्यक असते. एकीकडे आयटी सिटी, शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक सिटी, अशी आपली जागतिक पातळीवर ओळख होत असताना अद्याप पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही, त्यामुळे या प्रश्नाला माझे प्राधान्य राहील.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अधिकाधिक मेट्रोचे जाळे उभे राहण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्रातून पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे, तसेच आपल्यालगतची मुंबई, नाशिक, कोल्हापूर अशी शहरे रेल्वेसह अन्य प्रकल्पांतून जोडणे गरजेचे आहे, त्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणीही नाराज नाही; चर्चा निरर्थक उमेदवारी न मिळाल्याने पक्षातील सहकारी नाराज असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणीही नाराज नसल्याचे सांगितले. सर्वांशी बोलणे झाले असून, प्रचाराचा नारळ फोडताना आम्ही सगळे एकत्र दिसू, असेही त्यांनी सांगितले.
तर, कोथरूडला सर्व काही दिले जात असल्याबाबत खुलासा करताना राज्यसभेचा खासदार निवडताना तो एका भागाचा नाही, एका शहराचा म्हणून निवडला जातो. त्यामुळे या चर्चा निरर्थक असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत आपण गत दोन निवडणुकांप्रमाणे तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून येऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.