नागपूर | दूध उत्पादन वाढवायचे असेल, तर स्थानिक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारावे– नितीन गडकरी

Photo of author

By Sandhya



नागपूर : विदर्भात हरयाणा, पंजाब, गुजरात, राजस्थानातून गायी आणल्या जात आहेत. अशाने स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. मदर डेअरीशी जुळलेल्या ३५ हजार शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. यांच्यापैकी प्रत्येकाने पाच चांगल्या गायी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केल्या तर दूध उत्पादन वाढेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

मराठव-हाड दुग्ध उत्पादक संघटनेचा शुभारंभ तसेच धारा खाद्य तेल पॅकिंग केंद्राचे भूमिपूजन तसेच मदर डेअरीच्या बुटीबोरी स्थित मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. तेलंगखेडी मार्गावरील मदर डेअरी प्लान्ट येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, मदर डेअरी फ्रूट्स अॅड व्हेजिटेबलचे मनीष बंदलिश, नॅशनल डेअरी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सी. पी. देवानंद, मराठव-हाड दुग्ध उत्पादक कंपनीच्या चेअरमन वर्षा चव्हाण उपस्थित होत्या.

गडकरी म्हणाले, स्थानिक शेतकऱ्यांनी जास्त दूध देणाऱ्या गायी तयार केल्या तर त्याचा विदर्भातील शेतकऱ्यांनाच फायदा होईल. ‘मदर डेअरीने’ आता पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने येथील स्थानिक गो-पालकांच्या गायींच्या चांगल्या वाणांसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मदर डेअरीमार्फत पशुवैद्यकीय तज्ज्ञ एम्ब्रिओ ट्रान्सफर तसेच इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) सारखे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत तसेच दुग्ध उत्पादकांपर्यंत पोहोचतील अशा रीतीने प्रयत्न करावे. यामधून जवळपास प्रतिदिन १२ ते १५ लिटर दूध देणाऱ्या गाई तयार केल्या तर महाराष्ट्राला परराज्यातील गायी येथे आणण्याची गरज पडणार नाही. यावेळी गडकरी यांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली.

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे या एकेका जिल्ह्यांत ७० ते ८० लाख लिटर्स दूध उत्पादन होते. विदर्भातील भंडारा व गोंदिया हे दोन जिल्हा सोडले तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये दुधाचे उत्पादन फार कमी होते. पण आता मदर डेअरी प्रकल्पाच्या निमित्ताने विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्याची सुवर्णसंधी निर्माण झाल्याचे गडकरी म्हणाले.

संत्रा बर्फीचे मार्केटिंग
मदर डेअरीमार्फत नागपूर येथील सुप्रसिद्ध अशा संत्रा बर्फीचेदेखील मार्केटिंग होणे आवश्यक आहे. ही बर्फी शुद्ध संत्र्याचा पल्पपासूनच तयार केली जाईल. त्यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनादेखील फायदा होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Leave a Comment