
नागपूर : गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपाचे आमदार प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड झाली आहे. सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (18 डिसेंबर) अखेरच्या दिवशी केवळ शिंदे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित झाली होती.
यानंतर आज, गुरुवारी (19 डिसेंबर) विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडण्यात आला. यानंतर सभागृहातील सर्वांनी राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी होकार दिला. यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राम शिंदे यांची एकमताने निवड झाल्याची घोषणा झाली.
विधान परिषदेच्या कामकाजाला आज सुरुवात झाल्यानंतर आमदार श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांनी यांनी राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करावी असा प्रस्ताव मांडला. यानंतर मनिषा कायंदे आणि अमोल मिटकरी यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी राम शिंदे यांची विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड केली. यानंतर नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांची सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडला.