भगवानगड मुंडेंच्या बाजूने, संतोष देशमुख हत्या प्रकरणात नामदेव शास्त्रींचं ठाम मत

Photo of author

By Sandhya


बीड: अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी यांनी गुरुवारी रात्री उशिरा भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली आहे. रात्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावरच मुक्काम केला होता. दरम्यान, धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्याच बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेनंतर शुक्रवारी नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. धनंजय मुंडेंना आमचा १०० टक्के पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय संतोष देशमुखांनी आरोपींना केलेली मारहाण देखील दखल घेण्यासारखी आहे, असं मोठं वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केलं आहे.

धनंजय मुंडेंच्या भेटीबाबत विचारलं असता नामदेव शास्त्री म्हणाले, “आमच्यात दोन-अडीच तास चर्चा झाली. राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक विषयावर आमची चर्चा झाली. यावेळी मी धनंजय मुंडेंच्या मानसिकतेचा आढावा घेतला. त्यावरून मला जाणवलं, की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्मला आहे. ज्याचे पक्षातील सर्व नेते त्याचे बालमित्र आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना, त्याला गुन्हेगार ठरवलं जातंय, असं मला जाणवतंय. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवलं जातंय, यातून आमच्या संप्रदायाचं नुकसान झालंय. जातीवाद नसावा, या विचारांचे ज्ञानेश्वर महाराज होते. जातीवाद घालवण्यासाठी ७०० वर्षांपासून प्रयत्न केला जातोय. गेल्या काही वर्षांत जातीवाद कमी करत करत आणला आहे. पण काही लोक राजकीय स्वार्थासाठी हा जातीवाद पुन्हा उफाळून आणत आहेत. यामुळे जातीय सलोखा नष्ट होत चालला आहे.”

भगवान गडाचा धनंजय मुंडेंना पाठिंबा आहे का? असं विचारलं असता नामदेव शास्त्री म्हणाले की, आम्ही केवळ धनंजय मुंडेंच्या पाठीशी नाही आहेत, आम्ही भक्कमपणे पाठीशी आहोत. जे गुन्हेगार असतील, त्याचा शोध सुरू आहे. पण मला मीडियाला एक विचारायचं आहे, ज्या लोकांनी ही निर्घृण हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली, हे मीडियाने का दाखवलं नाही. आधी त्यांना जी मारहाण झाली होती, ती देखील दखल घेण्यासारखी आहे, असं मला वाटतं, असं खळबळजनक वक्तव्य नामदेव शास्त्रींनी केलं आहे.

Leave a Comment