देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उद्या १ जून रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार असून ४ जून रोजी निकाल समोर येणार आहे, या निकालावरुन आता राजकीय नेते दावे करत आहेत.
दरम्यान, निकालाआधी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंडिया आघाडीच्या मोठ्या विजयाचा दावा केला आहे. पटोले यांनी देशातील आणि राज्यातील विजयाचा आकडा सांगितला आहे.
“राज्यात ४० जागांच्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होणार आहे. इंडिया आघाडी देशात ३०० जागांच्यावर जागा जिंकेल असं चित्र आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
निवडणुका ज्यावेळी सुरू झाल्या होत्या त्यावेळी आम्ही मोदींविषयी जनतेच्या मनात रोष असल्याचे सांगितले होते. देशाचे संविधान सुरक्षित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांचा अपमान केला आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या “निवडणुकीच्या काळात सरकार मतदार राजाकडे मत मागायला गेली होती, त्याच काळात महाराष्ट्रात २६७ शेतकऱ्यांनी पाच टप्प्यामध्ये आत्महत्या केल्या होत्या. कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्यांना मदत दिली नाही याबाबत निवडणूक काळात मी स्वत: राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांना पत्र लिहिलं आहे.
पंतप्रधान मोदी यांना एका शेतकऱ्याने कांद्यावर बोला असं म्हणाला म्हणून त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल केला. म्हणजे शेतकऱ्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार नाही, राज्यात कायदा सुव्यवस्था वाढली आहे. राज्यात दुष्काळही वाढला आहे. राज्यात ७५ टक्के भागात दुष्काळ आहे. टँकर माफिया घोटाळा करत आहेत, असंही पटोले म्हणाले.
“मंत्री विदेशात, मुख्यमंत्री सुट्टीवर” “मुख्यमंत्री तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत, अनेक मंत्री विदेशात गेले आहेत. अशा पद्धतीने राज्य चालत नाही. आम्ही उद्या तीन जिल्ह्याचा दौरा करणार आहे. यानंतर आम्ही कमिशनर यांची भेट घेणार आहे. राज्यातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुष्काळ वाढला आहे. लोकांना भेटून याची माहिती घेणार आहे.
भाजपा या गोष्टीला राजकारण म्हणातात. पण लोकांची भेट घेण गरजेचे आहे, असंही नाना पटोले म्हणाले. पुण्यात धंगेकर यांनी उचललेले प्रश्न सर्वसामान्यांसाठी घेतले आहेत.
आम्ही सामान्यांसाठी लढायला तयार आहे, श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आणि सामान्यांसाठी वेगळा कायदा असं चालणार नाही. आम्हाला जनतेचे प्रश्न उचलताना सरकारविरोधात लढायचं आहे, आम्ही न्यायव्यवस्थेला मानणारे लोक आहोत, असंही नाना पटोले म्हणाले.