नाना पटोले : अजित पवारांनी सरड्यासारखा रंग बदलला ; त्यांच्यात माणसाचा धर्म दिसत नाही…

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तिखट टीका केली आहे. “अजित पवारांनी सरड्यासारखा रंग बदलला. मी त्यांना सरडा म्हणणार नाही. पण त्यांच्यात माणसाचा धर्म दिसत नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.

पटोलेंनी बुधवारी विधानसभेत नाशिकच्या इगतपुरीमध्ये गरोदर आदिवासी महिलेच्या मृत्यूप्रकरणी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर सभागृहाबाहेर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटोले म्हणाले की, “अधिवेशन सुरु आहे. पुरवण्या मागण्या मान्य झाल्या आहेत.

आदिवासी भागात रस्ते नाहीत. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याविषयी कॉंग्रेसने सभागृहात विषय मांडला आहे.’ ते पुढे म्हणाले की, पुरवण्या मान्य केल्या, पण एवढा पैसा आणणार कुठून? असा आमचा प्रश्न आहे. सरकार ज्यांच्याकडून पैसे घेते, त्यात आदिवासींचाही समावेश आहे.

पण सरकार आदिवासींना सोयी सुविधा पुरवते का? भाजप केवळ मूठभर लोकांना सोयी सुविधा देते. त्यामुळे त्यांचा सत्तेचा माज आता जनताच उतरवेल. भाजप नव्हे टोल पार्टी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्‌द्‌यावरून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

पटोले यांनी त्यांच्या या टीकेचा दाखला देत भाजपला धारेवर धरले. भाजपवाले टोलनाके मुक्त महाराष्ट्र करू अशी ओरड करत होते. आता काय झाले? टोलपासून किती सुटका झाली? ही टोल पार्टी आहे.

समृद्धी महामार्गावर निष्पाप लोकांची हत्या सुरू आहे, असे ते म्हणाले. हे सरकार घोषणांचा पाऊस पाडणारे आहे. त्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारमुळे होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला विद्यमान भाजप सरकार जबाबदार आहे, असा आरोपही पटोलेंनी यावेळी केला.

Leave a Comment