नाना पटोले : आता भारताच्या तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा…

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

हजारो शूरवीरांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. तिरंग्याची शान कायम ठेवत शेतकरी, कामगार, कष्टकरी, सीमांचे रक्षण करणारा जवान यांनी देश उभा केला.

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात सुईचे उत्पादनही होत नव्हते; पण, पंडित नेहरूंच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वाने प्रगतीचा पाया रचला. ७८ वर्षे हा तिरंगा डौलाना फडकत आहे; पण, आता तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. 

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलेच नाही. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टवर झालेल्या बलात्काराचा मुद्दा उपस्थित करून त्या राज्याला टार्गेट केले.

पश्चिम बंगालमधील घटनेचे समर्थन कोणीही करीत नाही. अशाच व यापेक्षा भयंकर घटना भाजपशासित राज्यात झाल्या, त्यावर पंतप्रधानांनी कधीच भाष्य केले नाही; पण, पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षाचे सरकार असल्याने जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आल्याचे पटोले म्हणाले.

गांधी-नेहरू कुटुंबावर टीका करताना भाजपमधील परिवारवादाकडेही पंतप्रधानांनी लक्ष द्यायला हवे. गांधी – नेहरू कुटुंबाने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्याग केला आहे. या कुटुंबाने आपली संपत्तीसुद्धा देशासाठी दान केली आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ९ वर्षे जेलमध्ये काढली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने मोठा संघर्ष केला; पण, २०१४ साली देशाला स्वातंत्र मिळाले असे मानणारे काही लोक आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचा खरा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे पटोले म्हणाले.

Leave a Comment