महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दडगावरची रेष आहे, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाने निवडणुकीत संविधान व्यवस्थेचे उल्लंघन केले. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडले गेले. तावडेंचा तो मतदारसंघ नसताना ते तेथे काय करत होते? कार्यकर्त्यांना भेटायला गेलो हा तावडेंचा बचाव चुकीचा आहे.
प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरच्या नेत्यांना थांबता येत नाही असा नियम आहे, त्यामुळे विनोद तावडे जे सांगत आहेत ते खोटे आहे. आर्वी विधानसभेचे भाजपा उमेदवार वानखेडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक आहेत, या वानखेडेंच्या गोदामात दारुच्या बाटल्यांचा साठा सापडल्या.
वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असतानाही हा दारु साठा कसा आला? मतदारांना पैसे व दारु वाटून भाजपाचा मते मिळवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
लोकसभेत व्होट जिहाद झाल्याचा भाजपाकडून अपप्रचार केला जात आहे. एखाद्या जात समुहाने एका पक्षाला मतदान करा असे आवाहन केले तर त्याला भाजपा व्होट जिहाद म्हणतो. मतदान कोणाला करायचे हा मतदाराचा हक्क आहे. आता एका समाजाने भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले, त्यालाही ‘जिहाद’ म्हणायचे का? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली.