नाना पटोले : “दूध उत्पादकांना दर वाढवून द्या, तेलंगणप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या”…

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

श्वेतक्रांतीमध्ये ज्या दुध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे त्यांनाच राज्यातील भाजपा-शिंदे सरकार लुटत आहे. गाई, म्हशींचे खाद्य व त्यांच्यावर होणाऱ्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे, त्याप्रमाणात दूध खरेदी दर मात्र कमी आहेत. हे दर वाढवून देऊन शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपा प्रणित सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. विविध राज्यात शेतकऱ्याच्या दुधाला ४५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला फक्त २७ रुपये भाव मिळतो आणि हेच दूध अमूल व इतर दूध कंपन्यांकडून ग्राहकाला ५५ ते ६० रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

तेलंगणप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट २ लाख रुपयांचे कर्ज माफ केले आहे.

२७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत असून भाजपा शिंदे सरकारनेही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा या अधिवेशनात करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, नीट परिक्षेच्या पेपरफुटीचे कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत पोहचले आहे.

ज्या ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे त्या त्या राज्यात नीट पेपर फुटीचे कनेक्शन सापडले आहेत. केंद्रातील सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून नीट परीक्षाच रद्द करा, अशी काँग्रेसने मागणी केली होती आता सीबीआय चौकशी सुरु झाली आहे पण परीक्षा रद्द केलेली नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

Leave a Comment