नाना पटोले : जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही; घटक पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार…

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचे कोणतेही सूत्र अद्याप ठरलेले नाही. लवकरच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते एकत्र बसतील आणि विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा होईल.

त्यानंतर एकत्रित बसून प्रत्येक मतदारसंघात पक्षांच्या कामगिरीच्या गुणवत्तेनुसार जागावाटपाचे सूत्र (फॉर्म्युला) ठरवू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पटोले म्हणाले की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले.

त्यामुळे विधानसभेत आमचे घटकपक्ष १०० जागांची मागणी करीत आहे. पण विधानसभेच्या जागा २८८ आहेत, हे लक्षात ठेवावे. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र आलो. विधानसभेतही आघाडी कायम राहावी, अशी आमची इच्छा आहे.

मात्र प्रत्येकाने शंभर जागावर दावा केला तर तीनशे जागा कोठून आणण्याचा हा प्रश्न निर्माण होतो. लोकसभेत चांगले यश मिळाल्याने प्रत्येक पक्षाला अपेक्षा असतात. त्या असल्‍याही पाहिजे. आम्हीही २८८ जागेची तयारी करीत आहोत. याचा अर्थ सर्व जागा लढवणार आहोत असा होत नाही.

आमच्या तयारीचा मित्रपक्षांनाही फायदा होऊ शकतो. पूर्व विदर्भात उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेने १४ जागा मागितल्या आहे. यावरही पटोले यांनी बोलणे टाळले. मात्र, मधला काळ सोडला तर काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात होती. जनतेचा कौल काँग्रेसला सर्वाधिक आहे, याकडे लक्ष वेधून त्यांनी ठाकरेंच्या पक्षाची मागणी तर्कसंगत नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले.

ते म्हणाले की भाजपने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या घोषणा केल्या होत्या. ओबीसी विरुद्ध मराठा अशी भांडणे लावली. समाजात तेढ निर्माण केली. आता याचे उत्तर भाजपलाच द्यावे लागणार. महाराष्ट्रातील जनतेला हे पटले नाही. त्यामुळे लोकसभेत भाजपचा पराभव केला.

महायुतीचे सरकार असंवैधानिक आहे हे आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आहोत. मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. मोठ्या नेत्यांनी मोठी खाती आपल्याकडेच ठेवली आहेत. विधानसभेत उत्तरे द्यायला मंत्री नाहीत. जनतेच्या प्रश्नांवर फक्त टोलवाटोलवी केली जात आहे. म्हणूनच मतदारांनी आपला रोष मतदानातून व्यक्त केल्याचा आरोप पटोले यांनी केला.

पटोले म्हणाले….

राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर राज्यात उष्माघाताने अनेकांचा बळी कंपन्यांमधील स्फोट, अन्य दुर्घटनांत अनेक मृत्यू राज्यात किड्यामुंग्याप्रमाणे माणसे मरताहेत राज्य सरकार कमिशनमध्ये मश्गूल सत्ताधारी मंत्री परदेश दौरे करताहेत ‘नीट’ गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार

Leave a Comment