विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्या अनुषंगाने राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? याबाबात चर्चा होत आहेत. असे असताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
“आता ७० दिवसांनंतर खरी मॅच सुरु होणार आहे. ही मॅच लपवाछपवीची नाही तर जनतेच्या दरबारातील मॅच आहे”, असा टोला नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला. तसेच नाना पटोले यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवण्यासंदर्भातही मोठं विधान केलं आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त आहे. या जागेसाठी लवकरच निवडणूक पार पडणार आहे. आता या जागेवर नाना पटोले निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
याबाबत त्यांनी सूचक भाष्यही केलं आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये अनेक तळागाळातील खेळाडू आहेत. त्यांना आजही संधी मिळत नाही. भारतात उद्याच्या काळात चांगले खेळाडू तयार व्हावे. पुढच्या येणाऱ्या पिढीला संधी मिळावी, असं आमचं स्वप्न आहे. त्यामुळे या मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवायची की नाही? याचा निर्णय येत्या आढवड्यात आम्ही घेणार आहोत”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, ” रवींद्र वायकर यांनी ज्यावेळी लोकसभा निवडणूक लढवली, त्यावेळी ते यासंदर्भात बोलले होते.
मला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार हे ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून राजकारण करतात. त्यांच्या पक्षात गेलं की वॉशिंगमशीनमध्ये धुतलं जातं, असं चित्र पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे भष्ट्र लोकांचा सरदार कोण असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत”, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.
काल विधानभवनात खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की, “सुर्यकुमारने कॅच घेतली आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बाहेर पाठवलं. त्याच प्रकारे आम्हीही दोन वर्षांपूर्वी विकेट पाडली”,असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते.
यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “दोन वर्षांपूर्वीची ती मॅच लपवाछपवीची होती. पण आता पुढच्या ७० दिवसानंतर खरी मॅच सुरु होणार आहे. जनतेच्या दरबारातील ही मॅच आहे. जनतेच्या आशीर्वादाची मॅच आहे. त्यामुळे त्याचं खरं उत्तर जनता देणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंना जनतेची काळजी नाही. या महायुती सरकारचा कॅच जनता घेणार आहे”, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.