नाना पटोले : “राज्याचे मुख्यमंत्री गंभीर माणूस नाहीत, खुर्ची वाचवणं हेच…”

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात हिट अँड रनची घटना घडली होती. त्यानंतर आता मुंबईतील वरळी परिसरात हिट अँड रनची घटना घडली.

वरळीतील घटनेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी राजेश शाह यांच्या मुलाने एका महिलेला चिरडले. या घटनेनंतर आता विरोधक आक्रमक झाले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. “राज्याचे मुख्यमंत्री गंभीर माणूस नाहीत”, अशी खोचक टीका नाना पटोले यांनी केली.

नाना पटोले काय म्हणाले?

“राज्यातील महायुतीच्या सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. वरळीतील घटना आणि त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी होते. अशा घटना सातत्याने घडत आहेत. महाराष्ट्र असुरक्षित राज्य झालं आहे.

आता हा संदेश देशात जाणं हे महाराष्ट्राच्या विकासाची गती थांबण्यासारखं आहे. राज्यातील महायुती सरकारला अजूनही जाग येत नसेल तर जनता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना जाग आणल्याशिवाय राहणार नाहीत”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

“वरळीतील हिट अँड रनची घटनेवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं होतं की आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गंभीर माणूस नाहीत. हे पहिले असे मुख्यमंत्री आहेत, त्यांना कोणत्याही घटनेबाबत काहीही देणंघेणं नाही.

आपली खुर्ची वाचवणं, भ्रष्टाचार आणि कटकारस्थान निर्माण करणं हेच त्यांच्यासाठी गौरव आणि अभिमान आहे”, अशी खोचक टीका नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

पटोले पुढे म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की दोन वर्षांपूर्वी ५० आमदार आणि आम्ही कशा प्रकराची बॅटींग केली. आता कटकारस्थान निर्माण करणं हे त्यांच्यासाठी गौरव आणि अभिमान आहे. त्यामुळे राज्याची चावी चुकीच्या माणसाच्या हातात दिली आहे, असं चित्र पाहायला मिळत आहे.

हे सरकार जनतेच्या पैशाची लूट करत आहे. राज्यात महागाई निर्माण करण्याचं काम या सरकारने केलं आहे. त्यामुळे सध्या चुकीच्या माणसाच्या हातात राज्याचं सरकार आहे. असं लोक आता बोलत आहेत”, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.

Leave a Comment