राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांमध्ये २२६ जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांची बोलणी दोन दिवसांत पूर्ण होऊन जागावाटप जाहीर होईल. तसेच आमच्यात कोणी लहान-मोठा भाऊ नाही. महाराष्ट्र वाचवणे हा धर्म असून, त्यासाठी आम्ही एकत्र लढत आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
येथील पत्रकार परिषदेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह पटोले, उत्तर महाराष्ट्राचे निरीक्षक निझामउद्दीन काजी, आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, शरद आहेर, राहुल दिवे, आकाश छाजेड, भारत टाकेकर आदी उपस्थित होते. यावेळी चेन्नीथला म्हणाले, महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनासाठी जनता तयार आहे.
महायुतीच्या अडीच वर्षांतील भ्रष्टाचारी सरकारचा बदला घेतला जाईल. दोन महिन्यांपासून सरकारने केवळ योजना जाहीर केल्या असून, यातून जनतेची दिशाभूल केली जात आहे. जाहीर झालेल्या योजनांसाठी सरकारकडे पैसे नाही, त्यांची अंमलबजावणी कशी होणार असा प्रश्न चेन्नीथला यांनी उपस्थिती केला. तसेच महाराष्ट्रातील जनता या जुमलेबाजीला फसणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पटोले म्हणाले, महायुतीचे सरकार घोषणाबाज आहे. निवडणुकाच्या तोंडावर महायुतीने १०० निर्णय घेतले. तिजोरीत पैसे नसताना निर्णय, योजनांचा धडाका लावला जात आहे. अर्थमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहिष्कार टाकत आहेत. या योजनांमधून फक्त महायुतीचा विकास होत असून, महाराष्ट्राचा विकास झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य विक्रीचा प्रयत्न महायुतीकडून होत असून, त्यामुळे जनता निवडणुकीची वाट बघत आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदार नियुक्तीतही महायुती सरकारने बेइमानी केली आहे, असेही पटोले यांनी सांगितले.
जागावाटपावरून महायुतीत वाद राज्यात महायुतीने महागाई वाढवली. महागाई वाढवून नागरिकांकडून ५ हजार रुपये घेत त्यांना दीड हजार रुपये परत करीत बेइमानी केली आहे. जाहिरातीसाठी हजार कोटी रुपये जनतेचेच वापरले आहे. या जाहिरातींवरून तसेच जागावाटपावरूनही महायुतीत महाभारत घडणार असल्याचा दावा पटोले यांनी केला.
मेरिटनुसार उमेदवार देणार
स्थानिक स्तरावर उमेदवारीसाठी वाद लावू नका. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते निर्णय घेत आहेत. पक्षाकडून नाशिक शहरासह राज्यातील कोणतीही जागावाटप जाहीर झालेली नाही. मतदारसंघातील राजकीय परिस्थिती तेथील निवडून येण्याची क्षमता यावरच उमेदवार दिला जाणार आहे. निवडणुकीत जिंकण्याच्या मेरिटवरच जागा वाटप केले जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले.